Sugar Health Risk: दारू आणि सिगारेट आरोग्यासाठी अपायकारक आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्या रोजच्या आहारातच अशी एक “पांढरी” गोष्ट लपलेली आहे, जी हळूहळू शरीराला हानी पोहोचवते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ही गोष्ट म्हणजे साखर आणि साखरयुक्त प्रक्रिया केलेले पदार्थ. डॉक्टरांच्या मते जास्त प्रमाणात साखर खाणे हे शरीरासाठी विषासारखेच आहे. साखरेमुळे शरीरात इन्सुलिन प्रतिकार वाढतो. यामुळे मधुमेह, फॅटी लिव्हर, लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. धक्कादायक बाब म्हणजे आपण थेट साखर खात नसतो, पण अनेक पदार्थांमधून ती नकळत शरीरात जात असते. लपलेली साखर कशी घातक ठरते? अनेकांना वाटते की, “मी चहा-कॉफीत साखर कमी घेतो, म्हणजे मी सुरक्षित आहे.” पण बिस्किटे, केक, चॉकलेट, पॅकेज्ड स्नॅक्स, शीतपेये आणि सॉस यामधून मोठ्या प्रमाणात साखर शरीरात जाते. हीच ‘लपलेली साखर’ सर्वात जास्त धोकादायक मानली जाते. hidden sugar १) टोमॅटो सॉस – गोड चव, मोठा धोका घराघरांत स्नॅक्ससोबत टोमॅटो सॉस खाल्ला जातो. पण एका चमचाभर सॉसमध्ये जवळपास एक चमचाभर साखर असते. त्यात कृत्रिम रंग आणि संरक्षक द्रव्येही असतात. विशेषतः मुलांना प्रत्येक पदार्थासोबत सॉस देण्याची सवय त्यांच्या शरीरात अनावश्यक साखर वाढवते. २) थंड पेये आणि ‘डाएट’ ड्रिंक्स उन्हाळ्यात थंड पेयांचे सेवन वाढते. काही जण ‘डाएट’ किंवा ‘शुगर-फ्री’ पेये घेतात. मात्र ही पेये पूर्णपणे सुरक्षित असतातच असे नाही. अनेक शीतपेयांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते. दीर्घकाळ अशा पेयांचे सेवन केल्यास मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. पॅकेज्ड फळरसही तितकाच धोकादायक असू शकतो. त्यात फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते, जे लठ्ठपणाला कारणीभूत ठरते. ३) फ्लेवर्ड दही – आरोग्यदायी की फसवणूक? घरचे साधे दही आरोग्यासाठी चांगले असते. पण बाजारातील फ्लेवर्ड किंवा गोड दह्यामध्ये साखर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पोषणमूल्यांपेक्षा अतिरिक्त साखरच जास्त मिळते. सावध राहा, लेबल वाचा या सर्व गोष्टींचा परिणाम लगेच दिसून येत नाही. पण वर्षानुवर्षे असे पदार्थ खाल्ल्यास शरीरावर गंभीर परिणाम होतात. लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि यकृताचे आजार वाढण्यामागे या गोड सवयी कारणीभूत ठरू शकतात. आरोग्य टिकवायचे असेल तर पॅकेजवरील घटक नीट वाचा. साखरेचे प्रमाण तपासा. शक्य तितका घरगुती आणि नैसर्गिक आहार निवडा. थोडी काळजी घेतली, तर भविष्यात मोठ्या आजारांपासून दूर राहता येईल.