पिंपरी | विधानसभा निवडणूकीसाठी सुधाकर घारे सज्ज

कर्जत, (वार्ताहर) – अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत-खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिवसेंदिवस पक्षप्रवेश वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे हे सज्ज झाले असल्याची चर्चा कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये होत आहे.
विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याने कर्जत-खालापूर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सुधाकर घारे यांच्याकडून मतदारसंघातील दौरे सुरू आहेत. गावभेटी करत ते कार्यकर्त्यांना नागरिकांना विश्वास देत आहेत.
पक्ष संघटना बळकट करण्यावर भर दिला जात असून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे कर्जत-खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे हात अधिक बळकट होत असून सुधाकर घारेंच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.
कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन
प्रत्येक वार्डमध्ये जास्तीत जास्त पक्षप्रवेश कसे होतील, याबाबत घारेंकडून पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
वार्ड कमिटी कशी करता येईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. नागरिकांना पक्षाचे विचार सांगून पक्षाची ध्येयधोरणे सामान्यांपर्यंत पोहचविण्याबाबत घारे सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.
समाजपयोगी उपक्रमातून शक्तीप्रदर्शन
मुलामुलींसाठी भव्यदिव्य रोजगार मेळावे, भव्य बैलगाडा शर्यती, सोमजाई माता उत्सव आदी विविध सामाजिक उपक्रम राबवून सुधाकर घारे यांच्याकडून वेळोवेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे.





