पुणे, दि. 28 – शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्तामार्गे जाणाऱ्या बसेसच्या मार्गांत पीएमपीने अचानक बदल केले. यामुळे गुरुवारी सकाळी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. या निर्णयावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून हा निर्णय माघारी घेण्याचे आवाहन केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमपीने बुधवारी उशिरा शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरून जाणाऱ्या बसेसचे मार्ग बदलले आहेत. काही बसेस आता स्वारगेट-टिळक रस्ता तर, काही बसेस स्वारगेट-दांडेकर पूलमार्गे जात आहेत. गुरुवारी सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याची माहिती नसल्याने त्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. तसेच चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी उशीर झाला. प्रशासनाने निर्णय घेण्यापूर्वी माहिती फलक लावणे किंवा प्रतिनिधी उभे करणे आवश्यक होते. पण यापैकी काहीच केले नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. कामानिमित्त मी दररोज मंडई ते कात्रज प्रवास करतो. आधी थेट बस होती, पण आता स्वारगेटपर्यंत “पुण्यदशम’ने जावे लागते, तर पुढे दुसरी बस शोधावी लागते. यात आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, बस बदलण्याचा त्रास आहे. यात माझा खूप वेळ जाणार आहे. पीएमपीने मार्ग बदलाचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा. – राजेश पवार, प्रवासी मी हुजुरपागा शाळेत शिकते. यासाठी सातारा रस्ता-सिटी प्राइड येथून येते. शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे बसची वाट पाहत होते. पण, या मार्गावरून बस बंद केल्याचे मला माहिती नव्हते. त्यामुळे खूप वेळ वाट पाहवी लागली. आता शाळेसाठी एकपेक्षा अधिक बस बदलाव्या लागतील. – एक विद्यार्थिनी पीएमपीचा मार्ग बदलण्याचा निर्णय चुकीचा आहे. यामुळे खासगी वाहनांना प्रोत्साहन मिळेल आणि प्रवासी दुरावेल. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी इतर उपायांची चाचपणी करावी आणि पीएमपीचे नियमित मार्ग सुरू ठेवावेत. – संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच