कोलकाता: पश्चिम बंगालमधील भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी तृणमूल कॉंग्रेसवर सूड उगावण्याचे वक्तव्य केल्यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर आल्यावर तृणमूल कॉंग्रेसवर सूड उगावला जाईल, असे पोस्टर घोष यांनी फेसबुकवर शेअर केले आहे. ममता बॅनर्जींनी 2011 मध्ये निवडणुकीपूर्वी “बदला नाही, बदल पाहिजे’ अशी घोषणा लोकप्रिय केली होती. त्याच धर्तीवर घोष यांनी फेसबुकवर “बदलही होईल, बदलाही होईल’ असे घोषवाक्य प्रसिद्ध केल्यामुळे हा वाद सुरू झाला आहे. ममता बॅनर्जींच्या घोषवाक्यामुळे तृणमूल कॉंग्रेस 2011 सालच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाली होती आणि तब्बल 34 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला सत्ता सोडावी लागली होती. ममता बॅनर्जी यांनी जनतेला बदला न घेता, राज्यातील सत्तेत बदल घडवण्याचे आवाहन केले होते. सत्ताबदल झाल्यावर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय हिंसाचार होईल, अशी भीती लोकांना वाटत होती. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी हे घोषवाक्य पुढे केले होते. मात्र, गेल्या 9 वर्षांत पश्चिम बंगालमध्ये केवळ सुडाचे राजकारणच केले जात आहे. भाजपच्या 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. त्यामुळे आम्ही सत्तेवर आल्यावर भ्रष्ट आणि समाजविघातक अधिकाऱ्यांचा याचा सूड घेऊ. अन्यथा लोक आम्हाला क्षमा करणार नाहीत, असे घोष यांनी आपल्या घोषवाक्याचे समर्थन करताना म्हटले आहे. भाजपवर निशाणा साधत तृणमूल कॉंग्रेसने म्हटले की, अशा प्रकारच्या टिप्पणीमुळे पक्षाची मानसिकता सिद्ध होते. केवळ गुंड आणि भाजप अशाप्रकारे सुडाची आणि हिंसेची भाषा करू शकतात. यांच्याबाबतचा निर्णय पश्चिम बंगालच्या जनतेला करायचा आहे. तृणमूल कॉंग्रेसला हिंसेच्या राजकारणावर विश्वास नाही, असे पक्षाचे सरचितणीस पार्थ चॅटर्जी म्हणाले.