एवढं क्लिष्ट काम? तेव्हा.. मिळकत ‘कर’ बिल ‘जुळती’

पुणे – महापालिकेतर्फे मिळकतरात 40 टक्के सवलतीसह करपात्र रकमेवर पाच टक्के वाढ यासह दिल्या जाणाऱ्या विविध सवलती, संस्थानिहाय बदलणारे नियम यांची तपासणी करून संगणकीय प्रणालीमध्ये अंतिम माहिती भरावी लागत आहे. प्रत्येक मिळकत नियमाच्या बदलानुसार ही माहिती अचूक भरावी लागत आहे. त्यानंतर संबंधीत मिळकत आणि नियमानुसार “करा’ची रक्कम याची “जुळणी’ झाल्यानंतर ते बील अंतिम केले जात असल्याने या कामाला वेळ लागत आहे.
पालिकेचा मिळकतकर विभागाचे काम सध्या वेगाने सुरू असले तरी मिळकतधारकांना बीले देताना ती अचूक असावीत, यासाठी संगणक प्रणालीनुसार काम केले जात आहे. दि. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या निवासी व बिगर निवासी मिळकतींना देखभाल-दुरुस्ती खर्च 15 टक्क्यांवरून 10 टक्के देऊन त्यांची अंमलबजावणी करताना अशा मिळकतीच्या करपात्र रकमेत पाच टक्क्यांनी वाढ करताना प्रामुख्याने संगणकीय प्रणालीत बदल करणे, एप्रिल 2019 नंतरच्या निवासी मिळकतींना सरसकट 40 टक्के सवलत देऊन त्यांच्या करपात्र रकमेत बदल करून करपात्र रक्कम कमी करणे, जीआयएस सर्व्हेअंतर्गत ज्या मिळकतींची 40 टक्के सवलत काढली होती, त्यांची करपात्र रक्कम पूर्ववत करणे, अशा तीन टप्प्यांत संगणकीय प्रणालीत बदल करून काम करावे लागत आहे, यातून संबंधीत मिळकतीचा वार्षिक कर निश्चित करावा लागत आहे.
यासह 2017 व 2021 मध्ये पालिकेत समाविष्ट गावे, नवीन मिळकतीची कर आकारणी यासह सोलर, रेन वॉटर, गांडूळखतासाठी सोसायट्यांना दिलेली सवलत हे मुद्देही लक्षात घ्यावे लागत आहेत. तसेच, शिक्षण संस्था, विविध संस्था, धार्मिकस्थळे, माजी सैनिक, शासकीय मिळकती, मोबाइल टॉवर, आयटी कंपन्या, पाणीपट्टीचे विविध प्रकार अशा सर्व मुद्यांनुसार संगणकीय प्रणालीत बदल करून माहिती भरावी लागत आहे, प्रत्येक मिळकत वेगळ्या स्वरपाची असल्याने त्यांचे कर बील तयार करताना अचूक काम करावे लागत असल्याने याला वेळ लागत आहे. अशाही स्थितीत दि. 31 मे पर्यंत सर्व मिळकत करांची बीले ऑनलाइन पाठविण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे.
मिळकत कर बीलांच्या कामासाठी सर्व घटकांचा विचार करून 165 संगणकीय प्रणाली तयार करण्यात येतात. एका प्रणालीसाठी तीन हजार लाइन्सचे कोडिंग करावे लागते. आमची संगणक टीम कुठलीही सुटी न घेता सध्या दिवस-रात्र काम करीत आहे, त्यामुळे 31 मेपर्यंत संपूर्ण मिळकतींची बिले तयार केले जातील.
– अजित देशमुख,उपायुक्त, महसूल (मिळकत कर)





