Pune : जिभेचे चोचले अन् घशाला टोचले!

पुणे : जिभेचे चोचले पुरवताना जीवावर बेतले, असे वाक्य ऐकल्यावर डोळे विस्फारल्याशिवाय राहात नाही. असाच प्रकार इंदापूर येथील एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या बाबतीत फेब्रुवारी महिन्यात घडला. मटण खाताना त्याचे हाड गिळले आणि ते अन्ननलिकेत अडकून बसले आणि अक्षरश: मटण खाणे जीवावर बेतले.
मटणावर ताव मारून जेवताना या वृद्ध व्यक्तीच्या अन्ननलिकेत मटणातील हाड अडकले. त्याचा जीव कासावीस झाला, त्याला श्वासही नीट घेता येईना. ते हाड एवढे धारदार चिपेसारखे होते की ते अन्ननलिका फाडून त्यात रुतून बसले. नातेवाईकांनी त्या वृद्धाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले; परंतु कोणीही शस्त्रक्रिया करून हाड काढण्याची जोखीम पत्करली नाही. शिवाय शस्त्रक्रिया करून ते काढावे लागणार होते, त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता खासगी रुग्णालयातही त्यांना दाखल करणे शक्य झाले नाही. त्यामुळे अखेर त्यांना ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ससून सर्वोपचार रुग्णालयात त्यांचे सिटीस्कॅन करण्यात आले. त्यामध्ये हे मटणातील हाड अन्ननलिकेच्या मध्यभागी आडवे रुतून बसल्याचे दिसले, तसेच त्याच्या बाजूला हृदय आणि रक्तवाहिन्या होत्या. हाडामुळे अन्ननलिका फाटली होती आणि त्यामुळे छातीमध्ये इन्फेक्शन वाढण्याची शक्यता होती. रुग्णाला साधी थुंकी गिळतानाही त्रास आणि असह्य वेदना होत होत्या. त्यानंतर रुग्णाची एन्डोस्कोपी करुन तपासणी करण्यात आली. अशा परिस्थितीत तातडीच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्यायच नव्हता. एन्डोस्कोपीद्वारे अन्ननलिकेत रुतलेला हाडाचा काही भाग मोकळा केला. नंतर रिजिडस्कोपीद्वारे संपूर्ण हाड अन्ननलिकेतून बाहेर काढण्यात आले. त्यादरम्यान बाजूला असलेले हृदय व रक्तवाहिन्यांना इजा होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. हे हाड ५.५० बाय ३ सेंटिमीटर लांबीचे होते.
फाटलेल्या अन्ननलिकेचे परीक्षण करून त्यामध्ये कोटेड सेल्फ एक्स्पान्डेबल मेटालिक स्टेंट टाकण्यात आले आणि फाटलेला भाग कव्हर करण्यात आला. या स्टेंटमुळे रुग्ण लवकर अन्न ग्रहण करू शकणार होता. जखम भरल्यानंतर हा स्टेंट काढून टाकण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला असून, आता त्या रुग्णाची प्रकृती पूर्णपणे बरी आहे.
रुग्णाचे वय, त्याच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेता मोठी शस्त्रक्रिया आणि गुंतागुंत रुग्णाला सहन होईल, याची शाश्वती नव्हती. त्यामुळे एन्डोस्कोपीच्या माध्यमाने उपचार करणे हे रुग्णाच्या हिताचे ठरले. ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक, घसा तज्ज्ञ आणि असोसिएट प्रोफेसर डॉ. राहुल ठाकूर, डॉ. शिंदे, डॉ. कांबळे, डॉ. क्षीरसागर यांचेही आम्हाला सहकार्य लाभले.
– डॉ. पद्मसेन रणबागले, असोसिएट प्रोफेसर, बी





