शिव प्रेमींसाठी आनंदाची बातमी ! सरकारकडून शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर ‘टोलमाफी’

पुणे – शिवजयंतीनिमित्त संपूर्ण राज्यभर ठीक ठिकाणी जोरदार तयारी सुरु झाली आहे. अशात स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारने देखील काही महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. शिव जयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिक दरवर्षी शिवनेरीवर दाखल होत असतात. शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी शनिवारी (दि. 18) सकाळी 8 पासून ते रविवार (दि. 19) च्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढले आहेत.
यासह शिंदे फडणवीस सरकारने शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर जाणाऱ्या वाहनांना टोलनाक्यावर टोल न आकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. म्हणजेच खालापूर, खेड, राजगुरु नगर येथील टोल नाक्यांवरुन जाणाऱ्या वाहनांना शिवजयंतीच्या दिवशी टोलमाफी देण्यात येणार आहे. यामुळे यंदाच्या शिव जयंतीला शिवनेरीवर मोठी गर्दी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मार्गांमध्ये बदल
नारायणगाव येथून जुन्नर येथे येणारी वाहतूक घोडेगाव फाटा, खानापूर महाविद्यालयमार्गे धामणखेल रस्त्याने ताथेड पार्किंग ठिकाणी जातील. सर्व वाहने ताथेड पार्किंग ठिकाणी लावण्यात येतील. आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज, सावरगाव, वारुळवाडी, नारायणगाव, घोडेगाव मार्गे जातील.
गणेशखिंड, बनकफाटा ओतूर मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने मुंढे हायस्कूल व आसपासच्या परिसरात असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात येतील. परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच मार्गे कल्याण, नगर, नाशिककडे जातील. आपटाळे, सोमतवाडीकडून येणारी वाहने प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड पार्किंगमध्ये लावण्यात येतील व पुन्हा वडज मार्गे परतीचा प्रवास करतील.





