satara | सातारच्या दिव्यांगांच्या लढ्याला यश

सातारा, (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेतील दिव्यांगांनी मुंबई येथील विधान भवनासमोर बुधवारी केलेल्या आंदोलनाला यश आले असून त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
दिव्यांग सदस्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी त्यांच्या मागण्या अंशतः मंजूर करत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
याबाबत अधिक माहिती अशी, दिव्यांगांच्या मागण्यांसाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजय पवार यांनी वेळोवेळी आंदोलने करीत प्रशासनाला निवेदने सादर केली होती. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येताच अजय पवार आणि जिल्ह्यातील दिव्यांगांनी दि. 2 रोजी मुंबईतील विधानभवनावरच अधिवेशनस्थळी धडक मारली.
याठिकाणी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, अजय पवार व कार्यकर्ते मागण्यांबाबत ठाम राहीले. या आंदोलनाची दखल घेत आज दि. 3 रोजी दिव्यांग मंत्रालयाचे सामाजिक न्याय सचिव सुमित भांगे यांनी अजय पवार आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी त्यांना निवेदन सादर केले.
ज्या व्यक्तीच्या नावावर जागा नाही अशा दिव्यांगांना घरकुलासाठी विनाअट जागा मिळावी, रिक्त अनुशेष दिव्यांग बांधवांचा लवकर भरण्यात यावा, विशेष भरती करून घेण्यात यावी, दिव्यांगांना रोजगार निर्मिती साधन तयार करण्यात यावे, दिव्यांगांच्या पाल्यास संपूर्ण शिक्षण मोफत मिळाले पाहिजे.
दिव्यांग बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात एसटी प्रवास मोफत मिळाला पाहिजे, दरवर्षी तीस लाख खर्च न करणार्या आमदारावर कारवाई करा व त्याचे वेतन बंद करा, दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे, सर्व दिव्यांगांना अंत्योदयचा लाभ मिळून 35 किलो धान्य मिळावे,
दिव्यांगांना व्यवसायासाठी 200 चौरस फूट जागा विनाअट देण्यात यावी, जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये तसेच महाविद्यालय, शाळा, जिल्हा मध्यवर्ती बँक, नॅशनल बँक, पोस्ट ऑफिस, स्टेट बँक याठिकाणी वेगळी खिडकी व रॅम्पची सोय करण्यात यावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी अजय पवार, अमोल निकम, अमोल भातुसे, ताज मुलानी, नितीन शिंदे, मारुती माने, धर्मेंद्र कांबळे, बाळासाहेब खोत, हरिभाऊ साळुंखे, दशरथ लोखंडे, पांडुरंग शेलार, रवी गाडे, मानाजी लोहार, अक्षय बाबर, अविनाश कुलकर्णी, प्रेरणा कदम, दीपक खडग, शांताराम देवरे, शालन लोखंडे, सुनीता ओंबळे, माधुरी देशमुख, शोभा मोरे, लतिका जगताप आदी दिव्यांग बांधव- भगिनी उपस्थित होत्या.
या निवेदनाबाबत सकारात्मक भूमिका घेत सचिव सुमित भांगे यांनी दिव्यांगांना लवकरच संजय गांधी निराधार पेन्शन 3 हजार रुपये मिळण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.
दिव्यांगांना व्यवसायासाठी 200 स्क्वेअर फुट जागाही लवकर देण्यात येईल, 35 किलो अंत्योदय कार्ड सर्व दिव्यांगांना देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
याचबरोबर येत्या १५ दिवसांत सगळे विषय सोडवले जातील. त्याबाबत सविस्तर बैठक घेतली जाईल. या बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्री, साताराचे जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित राहतील, असेही सांगण्यात आले.





