हिंगोली (शिवशंकर निरगुडे): हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गंधारी येथील नवनाथ कचरे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत (महावितरण) विद्युत सहाय्यक पदी निवड झाली आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, गावाचा आणि कुटुंबाचा मान उंचावला आहे. त्यांची निवड कल्याण येथे झाली आहे. संघर्षातून साकारले स्वप्न – नवनाथ कचरे हे गंधारी येथील अल्पभूधारक शेतकरी अंबादास कचरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे वडील गंधारी येथील हनुमान मंदिरात पुजाऱ्याचे काम करतात. अत्यंत बिकट परिस्थितीत आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नवनाथ यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, गंधारी येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण आश्रम शाळा, गडदगव्हाण येथे झाले. त्यांनी अकरावी आणि बारावीचे शिक्षण लोणी येथे पूर्ण केले, तर आयटीआय शासकीय जिंतूर येथून पूर्ण केले. ‘महावितरण’ची परीक्षा आणि दैदिप्यमान यश – लहानपणापासूनच हुशार असलेल्या नवनाथ कचरे यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असतानाच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घोरदडी येथील ३३ केव्ही सबस्टेशनवर बाह्स्त्रोत यंत्रचालक (Contractual Base) म्हणून काम केले. महावितरणने सरळ सेवा भरतीअंतर्गत २१ मे २०२५ रोजी विद्युत सहाय्यक पदासाठी परीक्षा घेतली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या या परीक्षेत त्यांनी दैदिप्यमान यश मिळवत विद्युत सहाय्यक पदावर स्थान पटकावले आहे. सत्कार करून गौरव – नवनाथ कचरे यांची कल्याण येथे विद्युत सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल घोरदडी येथील ३३ केव्ही सबस्टेशनवर त्यांचा सत्कार करण्यात आला. घोरदडी गावातील माजी सरपंच संजय चिलगर आणि त्यांच्या मित्रांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. तसेच, त्यांच्या मूळ गाव गंधारी येथील ग्रामस्थांच्या वतीनेही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. नवनाथ यांच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.