Telangana Election Result 2023: तेलंगणात विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार आतापर्यंत काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत तेलंगणामध्ये 67 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसचे निरीक्षक माणिकराव ठाकरे यांनी तेलंगणामध्ये काँग्रेस 70हून अधिक जागा जिंकेल असा मोठा दावा केला आहे. तसेच तेलंगणामधील या विजयाचे श्रेय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला दिल्याचे देखील माणिकराव ठाकरे यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले माणिकराव ठाकरे ?
तेलंगणामध्ये काँग्रेस ७०हून अधिक जागा जिंकेल. एक्झिट पोलनेही तेच सांगितले आहे. तेलंगणात काँग्रेसला अनुकूल वातावरण दिसून आले आहे, याचे श्रेय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जाते. त्यांच्या या यात्रेचे फलित म्हणून आम्ही नक्कीच ११९ पैकी ७० पेक्षा जास्त जागा जिंकू. आमच्या पक्षप्रमुख प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकांना आमच्या धोरणांबद्दल नीट समजावून सांगितले. राहुल गांधींच्या भारत जोडो दौऱ्याचा चांगला परिणाम झाला. केसीआर तेलंगणात एखाद्या बादशाह किंवा सम्राटासारखे वागले. काँग्रेसने तेलंगणाला राज्याचा दर्जा दिला होता.
पुढे ते म्हणाले, “राज्यातील प्रत्येकाची तीच इच्छा होती आणि ती इच्छा काँग्रेसने पूर्ण केली. तेलंगणाला वेगळ्या राज्याच्या दर्जा दिल्यावर तेथील लोकांची आणि राज्यातील प्रगती होईल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. याउलट राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे राज्यातील लोकांना आशेचा किरण दिसला,” असे म्हणत त्यांनी तेलंगणामधील विजय हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे झाल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माणिकराव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. केसीआर यांनी जाहिरातींवर अमाप पैसा खर्च केला. त्यांनी त्यांच्या फार्महाऊसमधून सरकार चालवले. कोणालाही रोजगार दिला नाही. पण आम्ही सर्वांशी बसून आणि बोलून पक्षाला पुढे नेले. सर्व काम विचारपूर्वक केले. चांगले वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे आता तेलंगणात आम्ही विजयी होऊ, असेही माणिकराव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, तेलंगणातील विधानसभेच्या १९९ जागांसाठी आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या प्रक्रियेनुसार तेलंगणात काँग्रेसच्या पंजाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. यासाठी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत आनंदोत्सव देखील साजरा केला जात आहे.