पिंपरी | अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्यात यश

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – आंदर मावळातील टाकवे बुद्रुक गावातून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शुक्रवार, १९ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. या संदर्भात अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव मावळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांच्या नेतृत्वाखाली एकूण सहा तपास पथके तयार करून मुंबई, लोणावळा, कामशेत, तळेगाव, देहूरोड, हिंजवडी भागात सदर मुलीचा शोध घेण्यात आला.
अल्पवयीन मुलीचे अपहरण करताना आरोपींनी चेहरा झाकून आणि विना नंबरप्लेटची मोटारसायकल वापरली होती, त्यामुळे त्यांच शोध घेणे कठीण काम होते. परंतु, गोपनीय बातमीदार यांची माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सदर मुलीचा शोध घेण्यात यश आले. दहा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आणि सखोल तपासाअंती सदर अपहरीत मुलगी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुखरूप मिळून आली आहे.
पोलिसांनी अनिकेत उमेश शेळके (वय २० वर्षे, रा. माण, ता. मुळशी, जि पुणे), ओमकार अरुण कुंभार (वय १८ वर्षे, रा. कुंभार वस्ती, माण, ता. मुळशी, जि. पुणे), निखिल धोड तळपे (वय १८ वर्षे, सध्या रा. भोसले वस्ती, महिला व्यायाम शाळेसमोर, माण, ता. मुळशी, मुळ रा साकूर्डी, ता. खेड, जि पुणे) या आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केलेली आहे.
यासह गुन्ह्यात आणखीन दोन अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश असून त्यांना बाल न्याय मंडळ येथे हजर केले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, सुनिल जावळे, सचिन गायकवाड, सचिन देशमुख, विशाल जांभळे, सचिन काळे, गणपत होले, अमोल तावरे, शशिकांत खोपडे,
बापुराव गावडे, सिध्दार्थ वाघमारे, संपत वायाळ, आदित्य भोगाडे, चेतन कुंभार, किरण डोले, प्रतिक राले, देविदास भागे, चेतन दळवी, नेहा भोर, आरती खर्डे, पोलीस पाटील अतुल असवले यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड हे करित आहेत.
पालकांनो मुलांवर लक्ष ठेवा –
पालकांनी पौगांडवस्थेतील मुलांचे मित्र, त्यांचा सोशल मीडियावरील वावर यावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. सोबत मुलांना वेळोवेळी विश्वासामध्ये घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असे आवाहन वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी केले आहे.





