Submarine Tourism Project : महाराष्ट्रातील वेदांता फॉक्सकॉनसह मुंबईतील डायमंड बोर्स गुजरात राज्याने पळवून नेला आहे. यामुळे राज्यातील लाखो- कोटी रुपयांची गुंतवणूक बुडाली आहे. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जात असल्याने अनेकांचे रोजगार हिरावले जात असताना आता सिंधुदुर्गमधील आणखी एक प्रकल्प सुरू होण्याधीच गुजरातने पळविला आहे.
2018 साली देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्गमधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्स जवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची या प्रकल्पात योजना होती. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतल्याने आता महाराष्ट्राची पाणबुडी गुजरातमध्ये प्रगटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सोबतच मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाबाबत नागरिकांना आश्वासनही दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, ”खोट्या बातमीकांवर विश्वास ठेवू नका. हा आपल्या राज्याचा प्रकल्प आहे, तो राज्यातून बाहेर जाणार नाही.” असं स्पष्टपणे सांगत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे.
असा होता पाणबुडी प्रकल्प….
2018 साली महाराष्ट्रातील पर्यटकाना आकर्षित करणारा पाणबुडी प्रकल्प गुजरात सरकाने पळविला आहे. तेव्हा आता प्रश्न विचारल्या जातोय की, चर्चा होत असलेला हा प्रकल्प होता कसा? तर सिंधुदुर्गात साकारला जाणारा पाणबुडी प्रकल्पात कर्मचाऱ्यांसह 24 प्रवाशांना समुद्राच्या पाण्याखालील अद्भुत दुनिया जवळून न्याहाळता येणार होती. या प्रकल्पामुळे पहिल्या वर्षी 5 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तर 100 ते 150 कोटींची उलाढाल होणार होती. त्यामुळे या प्रकल्पाची चर्चा होत आहे.