#ENGvIND 4th Test Day 1 : कोहली व ठाकूरने डाव सावरला

लंडन – कर्णधार विराट कोहली व संघात प्रथमच स्थान मिळवलेल्या अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांनी फटकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने इंग्लंडविरद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आपल्या पहिल्या डावात 191 धावा केल्या. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यजमान इंग्लंडच्या डावाचीही 3 बाद 53 अशी घसरण झाली.
इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट याने या मालिकेत सातत्याने त्रास दिला होता त्याला उमेश यादवने बाद करत भारताच्या मार्गातील मोठा आडसर दूर केला. दिवसअखेर डेव्हिड मलान 26 धावांवर तर, क्रेग ओव्हरटन 1 धावेवर खेळत आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने 2 गडी बाद केले तर, उमेश यादवने 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, भारताने कोहलीच्या अर्धशतकानंरही मोठी मजल मारली नाही. तो बाद झाल्यावर भारतीय संघ दीड शतकी मजल तरी मारणार का असा प्रश्न होता. मात्र, त्याचवेळी संघात स्थान दिलेल्या ठाकूरने आक्रमक फलंदाजी केली. त्याने कसोटीतील तिसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक साकार केले. मात्र, त्यानंतर तो देखील धावा वाढवण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 57 धावांच्या खेळीत 36 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 3 षटकार फटकावले.
त्यानंतर मात्र, तळातील तीनही फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे भारताला धावांचे द्विशतक साकार करता आले नाही. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने 4, ओली रॉबिन्सनने 3 गडी बाद केले. जेम्स अँडरसन व क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. पहिल्या डावात भारताने लीड्सवर झालेल्या तिसऱ्या सामन्याप्रमाणेच अत्यंत बेजबाबदार फलंदाजी केली. उपहारापर्यंतच्या खेळातच भारताने 20 षटकांत केवळ 39 धावांत 3 गडी गमावले. सलामीवीर लोकेश राहुल 17, हिटमॅन रोहित शर्मा 11 आणि चेतेश्वर पुजारा 4 यांनी साफ निराशा केली.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने रोहितला तर, ओली रॉबिन्सनने राहुलला बाद केले. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पुजाराला बाद करत भारताचा डाव अडचणीत आणला. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या जागी फलंदाजीत बढती मिळालेल्या रवींद्र जडेजाने कर्णधार विराट कोहलीला साथ देत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 30 धावा जोडल्या. जडेजा चांगला खेळत असतानाही बाद झाला. त्यावेळी संघाची स्थिती 4 बाद 69 अशी बिकट झाली होती. दरम्यान, कोहलीने या मालिकेतील आपले दुसरे अर्धशतक साकार केले.
त्याने 96 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. रॉबिन्सनने पुन्हा एकदा कोहलीला चकवले व यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी बाद केले. या मालिकेत सातत्याने अपयशी ठरूनही संघात स्थान कायम राखलेल्या अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांच्याकडून जबाबदार खेळाची अपेक्षा होती. मात्र, रहाणेही 14 धावांवर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 61.3 षटकांत सर्वबाद 191 धावा. (शार्दुल ठाकूर 57, विराट कोहली 50, लोकेश राहुल 17, अजिंक्य रहाणे 14, रोहित शर्मा 11, रवींद्र जडेजा 10, उमेश यादव 10, ख्रिस वोक्स 4-55, ओली रॉबिन्सन 3-38, जेम्स अँडरसन 1-41, क्रेग ओव्हरटन 1-49). इंग्लंड पहिला डाव – 17 षटकांत 3 बाद 53 धावा. (ज्यो रूट 21, डेव्हिड मलान खेळत आहे 26, क्रेग ओव्हरटन खेळत आहे 1, जसप्रीत बुमराह 2-15, उमेश यादव 1-15).




