पक्ष्यांसाठी भूमध्य समुद्र बनला अत्यंत धोकादायक

नवी दिल्ली :- पक्ष्यांना राहण्यासाठी आणि खाद्य मिळवण्यासाठी भूमध्य समुद्र अत्यंत धोकादायक बनत चालला आहे, असे एका अभ्यासाद्वारे पुढे आले आहे. भूमध्य समुद्रामध्ये होत असलेल्या प्लॅस्टिकच्या प्रदुषणामुळे तेथील सागरी सृष्टीचे जीवन धोक्यात येत चालले आहे, असे या नवीन संशोधनामध्ये म्हटले आहे.
भूमध्य समुद्राबरोबर काळा समुद्र, वायव्य आणि ईशान्य प्रशांत समुद्र देखील पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. याशिवाय अटलांटिक आणि हिंद महासागराच्या नैऋत्येकडील भागातही पक्षांसाठी राहण्यायोग्य परिस्थिती राहिलेली नाही, असे संशोधकांनी आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे.
संशोधकांनी अभ्यासासाठी सागरी पक्षांच्या 77 प्रजातींच्या तब्बल 7 हजार पक्षांचा अभ्यास केला. त्यासाठी 1.7 दशलक्ष ठिकाणांचे “रिमोट ट्रॅकिंग डिव्हाईस’ द्वारे सर्वेक्षण करण्यात आले. याचबरोबर जागतिक पातळीवर जेथे प्लॅस्टिकचा कचरा साठलेला आहे, अशा ठिकाणांच्या नकाशाचाही उपयोग करण्यात आला. प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे सागरी पक्षी जगभरात सर्वात धोकादायक जीव मानले जाऊ लागले आहेत.
जलचरांसाठीचा धोका जगभरात सर्वत्र समान नाही. जेथे प्लॅस्टिकचा कचरा साठला आहे, केवळ अशी ठिकाणेच पक्ष्यांसाठी धोकादायक ठरायला लागली आहेत. त्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याचा सर्वाधिक परिणाम कुठे आणि कोणत्या पक्ष्यांच्या प्रजातींना होतो हे ओळखता आले, असे पोर्तुगालमधील लिस्बन विद्यापीठातील विज्ञान शाखेच्या संशोधक मारिया डायस यांनी सांगितले.
सागरी पक्षी हे स्थलांतर करत असतात. त्यामुळे त्यांच्या राहणीमानात समानता आढळत नाही. वर्षभरात त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांमध्ये सातत्याने अनियमितता असू शकते. अशावेळी ते ज्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, तेथेही प्लॅस्टिक साचले असेल ती दोन्ही ठिकाणे पक्षासांठी धोकादायक असू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
जर समुद्रातील प्लॅस्टिकच्या कचऱ्याची समस्या वाढली तर आगोदरच धोकादायक असलेल्या सागरी पक्षांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच बिकट होण्याचीही शक्यता आहे. ही समस्या टाळण्यासाठी आता तरी कोणतेही उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर जनजागृती आणि प्रबोधन हा एकमेव उपाय सध्या तरी उपलब्ध आहे.





