आळंदी : श्रीज्ञानेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये गुणवत्ता विभागाच्या वतीने ‘विद्यार्थी घडताना’ या उपक्रमांतर्गत “अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली” या प्रेरणादायी मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये दिशा, प्रेरणा व सकारात्मकता निर्माण करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील युवा व्याख्याते प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी व्याख्यानात विद्यार्थ्यांची तुलना मिसाईलशी करत योग्य दिशा मिळाल्यावरच देशाचे भवितव्य घडते, असे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे ध्येय स्पष्ट ठेवून, नवीन शोध घेण्याची जिद्द अंतर्मनात बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. यश-अपयश आणि जीवनातील चढ-उतारांबाबत मार्गदर्शन करताना अपयश तात्पुरते असते. परंतु, यश चिरंतन असते आणि ते सोशल मीडियावर नाही, तर आपल्या कर्मावर अवलंबून असते, असे विचार त्यांनी मांडले. प्रा. धनगर यांनी विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ स्टेटस सिम्बॉलला महत्त्व न देता, स्वगुणांच्या बळावर मोठेपणा निर्माण करावा. आई-वडिलांचा सन्मान करत वक्त्यांनी विद्यार्थ्यांना रानफुलांसारखे राहण्याचे आवाहन केले. योग्य जमीन, हवा, पाणी आणि प्रकाश मिळाला तर ग्रामीण भागातील रानफुलेसुद्धा शहरातील गुलाबांना फिके पाडतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, ध्येयनिश्चय आणि सकारात्मकता वाढीस लागली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षिका अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, मुख्यलिपिका संगीता पाटील, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उपक्रम समन्वयक सोनाली आवारी, उज्वला कडलासकर, नारायण पिंगळे, गणेश लिखे, अजित मेदनकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली कातोरे यांनी केले.