बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता रोहित शेट्टी यांनी पहिल्यांदा रणवीर सिंह याच्यासोबत “सिम्बा’ बनविला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमविला होता. यानंतर ही जोडी पुन्हा एकदा धम्माल करण्यासाठी सज्ज झाली आहे. रोहित शेट्टीने “सर्कस’ चित्रपटाची नुकतीच अनाउन्समेंट केली आहे. यात रणवीर हा मुख्य भूमिका साकारत असून त्याच्यासोबत वरुण शर्मा, जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे काम करणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगचा प्लॉन रोहितने तयार केला आहे. या चित्रपटाचे शूटिंग वायआरएफ स्टुडिओत केल्यानंतर रोहित-रणवीर हे बांद्रास्थित मेहबूब स्टुडिओत शूट करणार आहेत. यासाठी रोहितने संपूर्ण मेहबूब स्टुडिओच बुक केला आहे. सध्या करोनाचा संसर्ग आणि काम लवकर करण्याच्या उद्देशाने रोहितने हा निर्णय घेतला आहे. यानंतर हैदराबाद आणि गोवा येथे चित्रीकरण करण्यात येणार आहे. रोहित शेट्टीसाठी गोवा लकी असल्याने त्याच्या सर्व चित्रपटाचे शूटिंग गोव्यात केले जाते. दरम्यान, “सर्कस’ हा एक कॉमेडी चित्रपट असून यात रणवीर आणि वरुण यांचा डबल रोल असणार आहे. हा चित्रपट शेक्सपियर यांच्या “कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकावर आधारित आहे. यापूर्वी गुलजार अंगूर यांनी यावर चित्रपट साकारला होता.