Pune District : रामदास बाबांच्या पालखी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी जिंकली मने
Pune District : विद्यार्थ्यांनी रामदास बाबांच्या पालखी सोहळ्यात केलेल्या भक्तिमय गीतांच्या सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे कौतुक म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

आळेफाटा : नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी आणि शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारी आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद येथे विद्यार्थ्यांसाठी समोसा व मोतीचूर लाडूच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी रामदास बाबांच्या पालखी सोहळ्यात केलेल्या भक्तिमय गीतांच्या सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे कौतुक म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.
गावची मानाची समजली जाणारी रामदास बाबांची पालखी यावर्षी शाळेतर्फे मानवंदना देण्यात आली.
पालखी सोहळ्यादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक व शालेय व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली विविध भक्तिमय गीतांचे सादरीकरण केले.मोठ्या जनसमुदायासमोर विद्यार्थ्यांनी केलेल्या या सादरीकरणामुळे पालखी सोहळ्याचे वातावरण अधिक भक्तिमय झाले.
विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे ग्रामस्थांनी कौतुक करत त्यांना बक्षीस रकमेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले. ग्रामस्थांकडून मिळालेल्या या कौतुकाचा आनंद विद्यार्थ्यां सोबत साजरा करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी शाळेत समोसा आणि मोतीचूर लाडूच्या मेजवानीचे आयोजन केले.विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
दरम्यान,गणपती बाप्पाच्या शाळेतील आगमनानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले.या धार्मिक कार्यक्रमासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्ग व शेतीशी जोडणारा आणखी एक उपक्रम राबविण्यात आला.शाळेच्या परसबागेत यावेळी वेगळ्या पद्धतीने उसाची लागवड करण्यात आली. या उपक्रमासाठी सुनीता काशीकेदार व सविता काशीकेदार यांचे सहकार्य लाभले.
शाळेच्या परसबागेसाठी वर्षभर आवश्यक असणारे बी-बियाणे,खत व औषधे मोफत उपलब्ध करून देणारे अविनाश आढाव यांचेही शाळेच्या वतीने सहकार्याबद्दल कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षणतज्ज्ञ डी. बी .नाना वाळुंज, शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय चौगुले पाटील, शालेय शेतकरी मित्र प्रदीप अण्णा गडगे, मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, सहशिक्षिका छाया डुंबरे, सुनंदा तांबे, गीतांजली बोराडे वाळुंज, सविता खेत्री, अविनाश आढाव, विनोद रांजणकर तसेच शाळेचे माजी विद्यार्थी संदीप भालके उपस्थित होते.
उपक्रमशील शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून सातत्याने केला जात असून, पालखी सोहळ्यातील विद्यार्थ्यांचे सादरीकरण आणि त्यानंतर आयोजित केलेली समोसा-लाडू पार्टी यामुळे शाळेच्या उपक्रमशीलतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले.





