Jamkhed News : विद्यार्थ्यांना मिळणार ‘दादां’च्या कर्तृत्वाची प्रेरणा! युवती प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे यांचा जामखेड तालुक्यात स्तुत्य उपक्रम
Jamkhed News : या अनोख्या उपक्रमामुळे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळातून व नागरिकांमधून संध्याताई सोनवणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा तथा अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या संध्याताई सोनवणे यांच्या वतीने जामखेड तालुक्यात एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आगामी जयंतीचे औचित्य साधून जामखेड तालुक्यातील तब्बल २१३ प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये मा. अजितदादा पवार यांची आकर्षक फोटो फ्रेम सप्रेम भेट म्हणून देण्यात येणार आहे. या अनोख्या उपक्रमामुळे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळातून व नागरिकांमधून संध्याताई सोनवणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांच्या कणखर प्रशासकीय कौशल्यासाठी, वक्तशीरपणासाठी आणि लोकहिताच्या धडाडीच्या निर्णयांसाठी ओळखले जातात. भावी पिढीला, म्हणजेच शालेय विद्यार्थ्यांना दादांच्या या गुणांची व कर्तृत्वाची सातत्याने प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने संध्याताई सोनवणे यांनी हा उपक्रम आयोजित केला आहे. तालुक्यातील शाळांच्या मुख्य कार्यालयात किंवा प्रार्थना सभागृहात ही फोटो फ्रेम लावली जाणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि ध्येयवादी विचार रुजण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जामखेड तालुक्यातील शाळांकडून मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दाखवली जात आहे. इच्छुक शाळांना एक माहिती अर्ज भरून द्यावा लागणार असून, यामध्ये शाळेचे नाव, युडायस (UDISE) कोड, मुख्याध्यापकांचे नाव व संपर्क क्रमांक या माहितीसह अधिकृत अर्ज सादर करावा लागणार आहे. यानंतर संबंधित शाळांना सन्मानपूर्वक ही फोटो फ्रेम सुपूर्द करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे या केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही नेहमीच अग्रेसर असतात. जामखेड तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबवून त्यांनी नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आता थेट तालुक्यातील २१३ शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा आलेख अधिक उंचावला आहे.
या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी अत्यंत नेटकेपणाने सुरू असून, तालुक्यातील सर्व शाळांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या शाळेचा अर्ज लवकरात लवकर सादर करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





