पिंपरी – विद्यार्थ्याचे यश हे शिक्षकांच्या शिकविण्यावर अवलंबून असते, शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्काराचा परिणाम विद्यार्थ्यावर होत असतो, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकांचे अभिनंदन करून शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना दूरध्वनी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. महापालिकेच्या वतीने आज शिक्षक दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे मंगळवारी (दि. 5) शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. आयुक्त शेखर सिंह यांनी व्हिडीओ संदेशात सांगितले की, शिक्षकांसाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. विद्यार्थ्याला बदलत्या जगाची ओळख करून देऊन त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम शिक्षक करत असतात. शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी महापालिका यशस्वी प्रयत्न करित असून पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची भविष्यात संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांबळे, उल्हास जगताप, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सूत्रसंचालन शिक्षक गणेश लिंगडे यांनी केले. तर, आभार प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी मानले. पालिकेचे आदर्श शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये प्राथमिक विभागातील मोहम्मद शाहबाद, अमिता रसाळ, नीता बोचरे, योगिता पर्बत, नितीन गोडे, योगिता सोनवणे, जयश्री राऊत, अनिता जगताप या शिक्षकांचा समावेश आहे तर माध्यमिक विभागातील सोमनाथ देवरे, अस्मिता गुरव, वर्षा हडपसरकर या शिक्षकांचा तर बालवाडी विभागातील पूनम कोलते, शैला जाधव, शबाना मोमीन या शिक्षकांचा आणि खाजगी विभागातील विजयकुमार सोळुंके, शारदा सस्ते या शिक्षकांचा समावेश होता. तसेच, पालिकेच्या वतीने विशेष पुरस्कारही देण्यात आले. म्हेत्रेवाडीतील पीसीएमसी पब्लिक स्कूल, कासारवाडीतील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांचा तसेच सुरेखा कुंजीर, सविता गावडे, मंजुषा अहिनवार, सारिका राऊत, शिवाजी दौंडकर, वासंती चव्हाण आणि मोमीन मोहसीन उपशिक्षकांचा समावेश होता.