विद्यार्थ्यांनो, अभ्यास सुरू कराच!

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार
पुणे – विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने अखेर दिला. आता विद्यापीठांना परीक्षा घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना परीक्षेपासून सुटका मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. सध्याची करोनाची परिस्थिती पाहता राज्यात अंतिम वर्षाची परीक्षा सप्टेंबरनंतर होतील, असे चिन्हे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, आता मागील घटनेचा विचार न करता “पॉझिटिव्ह’पणे पुन्हा परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून महाराष्ट्रासह सात राज्यांनी न्यायालयात धाव घेतली. करोनामुळे तूर्तास परीक्षा घेणे शक्य नाही, असे सांगत ही परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे योग्य नसल्याचे सांगत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले.
राज्यातील करोना स्थितीचा विचार करून परीक्षेसाठी मुदत वाढवून देण्यासाठी “यूजीसी’कडे मागणी करता येणार आहे. “यूजीसी’ने दिलेल्या 30 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्रात परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे सप्टेंबरनंतर केव्हाही परीक्षा होतील. त्याचा विचार करून विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी मानसिक तयारी करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात दोन मतप्रवाह होते. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना “प्रमोट’ करणे ही योग्य बाब नसून, परीक्षा घेतलेच पाहिजे, असे काही शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे होते. याउलट काही अपवाद वगळता बहुतांश विद्यार्थी संघटनांनी परीक्षा रद्द झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. यात राजकारणाचा प्रवेश झाला. त्यामुळे हा विषय न्यायालयापर्यंत गेला. अखेर न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे सर्वांना बंधनकारक आहे.
कुणी विश्वासात घेतलं नाही…
गेल्या तीन-चार महिन्यांत परीक्षेच्या विषयावर होणाऱ्या राजकारणावरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. या कालावधीत विद्यार्थ्यांची काय मानसिकता आहे, याचा कोणीच विचार केला नाही. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काहीच निर्णय न घेता तो विषय प्रतिष्ठेचा बनला. गेल्या चार महिन्यांपासून विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे. कोणी जिंकला, हरला हा प्रश्न महत्त्वाचा नसून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरकडे किती गांभीर्याने पाहिले जाते, हेच यातून स्पष्ट होत आहे. या प्रश्नांत विद्यार्थ्यांना विश्वासात न घेतल्याची भावना विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे.





