पिंपरी | विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे – गौतम इंगळे

चिखली, (वार्ताहर)- बदलत्या काळानुरूप विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून व्यक्तिमत्वाचा विकास करावा. विद्यार्थ्यांनी बहुविध व्यक्तिमत्व विकसित करणार्या वाटा निवडल्यास ते अपेक्षित ध्येय साध्य करू शकतील, असे मत चिखली येथील श्री दादा महाराज नाटेकर गुरुकुल शाळेचे मुख्याध्यापक गौतम इंगळे यांनी व्यक्त केले.
चिखली येथील श्री गुरुदत्त सेवा मंडळाच्या सभागृहात श्री संत संताजी सेवा मंडळ आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पिंगळे डेंटल हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. सुजाता पिंगळे, प्रा. प्रशांत मोरे, पोपट पिंगळे,
अमित शिंदे, विनीत राऊत, महेश देशमाने, शिवाजी अंबिके, डॉ. प्रतापराव तेली, विनायक गाताडे, सुभाष खंदारकर, किशोर कहाणे, शशिकांत पुंड, श्रीकांत पिंगळे, हरिश्चंद्र पिंगळे, रवींद्र हरकुळकर, मनोहर जाधव, सतीश कहाणे, पंडित अंबिके उपस्थित होते.
इंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी कल्पनेला प्रत्यक्षात उतरविल्यास खरे यश म्हणता येईल. यशाचे श्रेय टीकाकारांना द्या, असा मोलाचा सल्ला दिला. प्रशांत मोरे यांनी दहावीनंतर प्रत्येक शाखेला महत्व असल्याचे सांगून आपण स्वीकारालेल्या क्षेत्रात सर्वोच्च काम करण्याबद्दल सांगितले.
डॉ. सुजाता पिंगळे यांनी शिक्षणाच्या विविध वाटा सांगून, आतापासून ध्येय ठरवून त्यानुसार वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. तर विनायक गाताडे यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील संधीची माहिती दिली.
लक्ष्मण पिंगळे यांनी पालकांनी विद्यार्थ्यांचा कल पाहून, मुलांना आवडीप्रमाणे शिकण्याची संधी द्यावी असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी अंबिके यांनी तर अमित शिंदे यांनी आभार मानले.





