Pimpri : विद्यार्थ्यांनी ध्येयवेडे होऊन, यशस्वी व्हावे : गणेश गरुड

निगडी : पी.ई.एस. मॉडर्न इंग्लिश मिडियम हायस्कूल, यमुनानगर, निगडी येथे नुकत्याच पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांना “फक्त गुणांपुरते मर्यादित न राहता, आत्मविश्वास व चिकाटीने यशाचा पाठलाग करावा,” असा मंत्र देत प्रमुख पाहुणे आणि अभिनव एज्युकेशन सोसायटी, आळंदीचे चेअरमन गणेश पांडुरंग गरुड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
या सोहळ्यात दहावी परीक्षेत उत्तुंग यश मिळवणारे तसेच शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. केवळ गुणांच्या शर्यतीत नव्हे, तर सर्वांगीण विकासासाठी शाळेने विविध उपक्रम राबवण्याची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या औचित्याने शिक्षकवृंदांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदरभाव वृद्धिंगत करणारा हा क्षण विशेष लक्षवेधी ठरला.
प्रा. डॉ. अतुल फाटक यांनी विद्यार्थ्यांसमोर ‘पंचम गुणसूत्र’ सादर केले. अभ्यास, विचार, आत्मपरीक्षण, आकलन आणि कृती या पाच घटकांच्या आधारे यशाचे गूढ उलगडत त्यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. या कार्यक्रमासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख व सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
चेअरमन दीपक मराठे, मुख्याध्यापिका गौरी सावंत, पालक प्रतिनिधी वंदना मुळे, मेघना बनसोडे, रवींद्र सानप, वैशाली गिलबिले आदी उपस्थित होते.





