पुणे जिल्हा | शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

परिंचे, (वार्ताहर) – आपण जे रोज अन्न खातो ते अन्न पिकवण्यासाठी शेतकर्यांना किती कष्ट करावे लागतात याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी मांढर (ता.पुरंदर) जवळील शिंदेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भात लावणीचा अनुभव देण्याचा उपक्रम घेण्यात आला.
रोहिदास शिंदे यांच्या भात लावणीच्या शेतामध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी भात लावणी संदर्भात विविध प्रश्न विचारले. भात लावणीच्या अगोदर शेती कशी तयार करतात रोप कसे काढतात मुठी कशा बांधतात चिखल कसा तयार करतात. असे प्रश्न विचारून त्या संदर्भातील उत्तरे जाणून घेतली.
तसेच शेतामध्ये प्रत्यक्ष भात लावणीचा अनुभव घेतला.अनुभवातून शिक्षण घेतल्याने ते शिक्षण चिरकाल टिकते. भात लावणीसाठी होणारे कष्ट पाहून विद्यार्थ्यांना शेतकर्यांच्या कष्टाचे मोल समजले. त्यामुळे यापुढे अन्न वाया घालवणार नाही असा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन तयार झाला.
दुर्गम भागातील व डोंगरी भागात ही शाळा असून माहूर केंद्रप्रमुख राजेंद्र कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत वर्षभर वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. प्रत्यक्ष कृतीवर भर देऊन अध्यापन केले जाते.
शनिवार माझ्या आवडीचा या नवीन उपक्रमांतर्गत शाळेत विविध सहशालेय उपक्रम घेतले जातात खेळ गाणी गोष्टी यावर भर दिला जातो.
अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला भोसले व सहशिक्षिका स्वाती कटके यांनी दिली. भात लावणी उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अतुल शिंदे, सुजाता शिंदे, वर्षा शिंदे, छबुताई शिंदे, विजया शिंदे यांनी सहकार्य केले.





