Satara | ‘किसन वीर’च्या विद्यार्थ्यांनी झाडांना बांधल्या राख्या

वाई, (प्रतिनिधी) – येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रीन क्लबच्या विद्यार्थिनींनी झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, रक्षाबंधन हा सण एनएसएस विभाग अभिनव पद्धतीने साजरा करत आहे. यानिमित्त झाडांना राख्या बांधल्याने, त्या झाडांचे संगोपन व संवर्धनाची जबाबदारी आपल्यावर येते. एनएसएसचे स्वयंसेवक सजग असणे गरजेचे आहे.
जागतिक तापमानवाढ ही मोठी समस्या आहे. त्या समस्येला तोंड देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात फुलपाखरू उद्यान संवर्धन करावे, असे आवाहन प्राचार्यांनी केले.
प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ. राजेश गावीत यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी प्रा. डॉ. सुनील सावंत, एनएसएसचे सल्लागार प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. हणमंत कणसे, प्रा. सुमंत सावंत उपस्थित होते.





