बिबवेवाडी, दि. 28 – “प्रत्येक घरातील मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेऊन सीए, डॉक्टर, वकील, इंजिनीअर व्हावे. त्यांनी समाजाची सेवा करावी,’ असे मार्गदर्शन बिबवेवाडी श्री संघाच्या चेअरमन शोभा धारिवाल यांनी येथे केले. बिबवेवाडी जैन स्थानकामध्ये या वर्षीचा चातुर्मास जैन धर्म गुरू प. पू. श्री सुमित्रजी म. सा. आदी यांच्या सानिध्यामध्ये मोठ्या उत्साहात सुरू आहे. येथे चातुर्मासाच्या सुरुवातीपासून अनेक समाजोपयोगी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी अपार मेहनत करून उच्च शिक्षण प्राप्त केले आहे. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवणे हे संघ समाजाचे कर्तव्य समजून बिबवेवाडी श्री संघाने साध्वीच्या सानिध्यामध्ये उच्च शिक्षित विद्याथींचा सत्कार करण्याचे आयोजन केले होते. यामध्ये एकूण 30 विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार संस्थेच्या चेअरमन शोभा धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आला. पर्युषण पर्वात विविध सांस्कृतिक कार्यक्रम श्रुत बहुमंडळाच्या सदस्य व बाळ गोपाळांसहित साजरा झाला. या कार्यक्रमासाठी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी माणिकचंद दुगड यांनी प्रास्ताविक केले, तसेच सूत्रसंचालन गणेश ओसवाल व सुनील बलाई यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने साक्षी दुगड यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिबवेवाडी संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुगड, पन्नालाल पितळिया, गणेश ओसवाल, लालचंद कर्नावट, अविनाश कोठारी, बाळासाहेब कोयाळीकर, सुनील बलाई, संपत भटेवरा, सुभाष बाफना, चंपालाल नहार, रामलाल संचेती, चंद्रकांत लुंकड, प्रवीण चोरबेले, किशोर छाजेड यांनी योगदान दिले.