शिरूर : शिरुर शहरातील कॅनरा बँकेच्या पाठीमागील स्टीमरूम कॅफे वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. कॉलेजमधील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे येऊन सेपरेट पार्टिशनचा फायदा घेत अश्लील चाळे करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. कॅफेमध्ये दोन ते तीन जणांसाठी वेगवेगळे केबिनसदृश पार्टिशन तयार करण्यात आले आहेत. या बंदिस्त जागेमुळे युवक-युवती कॅमेऱ्यांच्या नजरेपासून दूर राहून गैरप्रकार करत असल्याचे सांगितले जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अचानक भेट देत परिस्थिती प्रत्यक्ष पाहिल्याचे समजते. कॉलेज सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची या कॅफेमध्ये वाढलेली वर्दळ पाहून अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. “अशा ठिकाणी मुलं तासन्तास बसतात, अभ्यासापासून दुरावतात,”“बंदिस्त पार्टिशनमुळे काय चाललंय हेच कळत नाही,” असे पालकांचे म्हणणे आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीमध्ये या कॅफेमध्ये नियमित राजरोसपणे विद्यार्थी विद्यार्थिनी अश्लील चाळे करत असून तीन रूम कॅफेमधील पार्टिशन तात्काळ उध्वस्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “शहरातील अशा गुप्त कॅफेंमुळे युवकांमध्ये चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. पोलिसांनी हे कॅफे तात्काळ बंद करून कडक कारवाई करावी.”. कॅफे चालवणाऱ्यांनी पार्टिशन का आणि कशासाठी तयार केले, सीसीटीव्ही व्यवस्था आहे का याचीही चौकशी होण्याची मागणी केली आहे. शहरातील तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून अशा ठिकाणांवर योग्य नियमन आणि देखरेख ठेवणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. शहरात या कॅफेत अश्लील चाळे सुरू असून शिरूर पोलिसांना याची माहिती नाही याबद्दल नागरिकांना नवलच वाटत आहे.