विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक शिक्षण घेण्याची गरज – आनंदराज आंबेडकर

पुणे – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केवळ कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपारिक शाखांच्या पदव्या मिळवून नोकरी मिळण्याची फारशी शाश्वती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी अत्याधुनिक शिक्षण घेण्याची गरज निर्माण झालेली आहे, असे मत पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.
येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ.डी.जी.देशकर, सचिव संजीव बोधनकर, डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.गौतम बनसोडे, आयक्युएसी समन्वयक प्रा.डॉ.रुपेश थोपटे, महाविद्यालय विकास समिती सदस्य राहुल सानप, डॉ.शरद आहेर, माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ नजन, डॉ.रघुनाथ मिसाळ आदी उपस्थित होते. एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा.संपत शिंदे यांनी रक्तदान शिबिराचे नियोजन केले होते.
वाढत्या लोकसंख्येबरोबरच बेरोजगारांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य प्रशिक्षणही घेण्याची आवश्यकता आहे. नोकरीचे मार्केट कशाला आहे हे विद्यार्थ्यांनी शोधले पाहिजे. आज संगणक, कायद्याचे ज्ञान विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द अंगी बाळगण्याचीही आवश्यकता आहे, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गौतम बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नारायण खरात यांनी केले. आभार प्रा.डॉ.रुपेश थोपटे यांनी मानले.





