नगर | डाॅ.मोरे यांच्याविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा

जामखेड, (प्रतिनिधी) – रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या मनमानीला कंटाळून जामखेड येथे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच अनुषंगाने आज तिसर्या दिवशी गुरुवारी सकाळी खर्डा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी, विविध संघटना व पक्षांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
सकाळी खर्डा चौकात रत्नदीप मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, संघटना व काही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चासाठी जमा झाले होते. सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी रत्नदीपचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर आण्णासाहेब सावंत यांनी संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की, रत्नदीप मेडिकलने जो काळा बाजार मांडला आहे, त्याविरोधात सर्वांनी मिळून आवाज उठवला पाहिजे, यावर एक कमिटी नेमावी व लवकरात लवकर हे प्रकरण हाताळावे. सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे म्हणाले, जामखेड तालुका हा ऐतिहासिक तालुका आहे.
या ऐतिहासिक तालुक्यात आशा संस्थाचालकाकडून अशा घटना घटत घडत आहेत, हे दुर्दैव आहे. तीन दिवस झाले तरी यावर प्रशासनाकडून तोडगा निघाला नाही, त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली.मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, मनसे नेते हवाशेठ सरनोबत यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले म्हणाले की, ज्या विद्यार्थिनींवर अन्याय होत आहे
त्यांनी पुढे येऊन तक्रार दिली पाहिजे. गेल्या दोन दिवसांपासून गावातील सुव्यवस्था बिघडली आहे, याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे. बाहेरुन आलेल्या विद्यार्थ्यांच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी आहोत. आ.रोहित पवार व आ. प्रा. राम शिंदे व पालकमंत्री यांनी देखील याविषयाकडे गांभीर्याने पाहून हा विषय हाताळला पाहिजे.विद्यार्थ्यांनी भास्करर मोरे यांच्याकडून कशाप्रकारे छळ केला जातो,याची आपबिती सांगितली.
मोर्चा दरम्यान तहसीलदार यांनी सांगितले की, आपण दिलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन आम्ही वरिष्ठ पातळीवर कळवले आहे. विनाकारण विद्यार्थ्यांना घातलेल्या बंधनाबाबत डॉ मोरे यांना समज दिली आहे. इतर मागण्यांबाबत संबंधित कुलगुरूंना मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे. तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे तालुकाध्यक्ष पांडुराजे भोसले, रमेश आजबे, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, हवा सरनौबत, सनी सदाफुले, आण्णासाहेब सावंत, पवनराजे राळेभात, महेश निमोणकर, गणेश हगवणे, सचिन देशमुख, अवधूत पवार, नाना खंडागळे, आकाश घागरे, भाऊ पोटफोडे, गणेश मासाळ, गणेश जोशी, विजय (टील्लु) राळेभात, विकास मासाळ, बाळासाहेब ढाळे, रोहित चव्हाण, आम आदमीचे संतोष नवलाखा, अनिल पाटील यांच्यासह रत्नदीप मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





