शिक्षकांनीही घेतला सहभाग : “मॉडर्न’चा “भिंती पलीकडील शाळा’ उपक्रम
निगडी – यमुनानगर येथील मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात भात लावणीचा अनुभव घेतला. स्काऊट गाईडच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. अनेक वेळा शहरी भागातील मुलांना कोणते पीक कुठे येते याची माहिती नसते. केवळ पुस्तकातून विद्यार्थ्यांना शेती आणि त्यातील पिकांची माहिती होणार नाही तर प्रत्यक्ष अनुभूती महत्त्वाची असून याच हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मॉडर्नचे प्राचार्य डॉ. सतीश गवळी यांनी सांगितले.
यासाठी भिंती पलीकडील शाळा उपक्रमांतर्गत चिखली येथील शेतकरी दत्तू भुजबळ यांच्या भात शेतीस विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रत्यक्षात गुडघाभर चिखलात जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांनी भात लावणी केली. शेतकऱ्यांबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी भर पावसात भात लावणी केली. यातून शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. नंतरच्या सत्रात विद्यार्थ्यांनी भात पिकाबद्दल अनेक प्रश्न विचारून माहिती मिळविली. यामध्ये भात लावणी पूर्व मशागत कोणती? भाताची रोपे कशी तयार करतात? भाताचे पीक किती दिवसात येते? भातशेतीचे संरक्षण कसे करायचे? भातपिकाची कापणी साठवण आणि वाळवण या सर्व प्रक्रियेची माहिती घेतली.
यामुळे विद्यार्थ्यांना श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व कळाले. सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. या उपक्रमाचे प्राचार्य डॉ. सतीश गवळी, संस्था उपकार्यवाह शरद इनामदार, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे यांनी कौतुक केले. या भातशेती लागवडीसाठी स्काऊट गाईडच्या शिक्षिका आशा कुंजीर, सुजाता ठोंबरे, शिवाजी अंबिके यांनी परिश्रम घेतले.