पवनानगर, (वार्ताहर) – पवना विद्या मंदिर शाळेत पाच किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरुन पायी चालत येणाऱ्या १५ गरीब व गरजू मुलींना रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या मोफत सायकल वितरित करण्यात आल्या. यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार, सचिव राजेंद्र पंडित, डॉ. अशोक दाते, अजय पाटील, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी अनेक सेवाभावी संस्था मदत करत असतात. या सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी भारताचा एक जबाबदार नागरिक होऊन वंचितांच्या सेवेसाठी तयार रहावे. तर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जास्तीत जास्त वेळ भेटत नाही, कारण त्यांना पायपीट करून शाळेत यावे लागते. यामुळे या सायकलींचे वाटप करण्यात आल्याचे मिलिंद शेलार यांनी सांगितले.