वर्गात बसायचं सोडून बाहेर का फिरतो? विचारणाऱ्या मुख्याध्यापकाचा विद्यार्थ्याने घेतला जीव

विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडवण्यासाठी शिक्षक त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र एका विद्यार्थ्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न मुख्याध्यापकाच्या जीवावर बेतला आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात हायस्कूल मुख्याध्यापकाची १७ वर्षीय विद्यार्थ्याने गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एस. के. सक्सेना (वय ५५) असे या मुख्याध्यापकांचे नाव असून ते धमोरा शासकीय हायस्कूल येथे कार्यरत होते.
शुक्रवारी दुपारी १.३० वाजता ही घटना घडली. हत्या केल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांचीच दुचाकी चोरून मित्रासोबत घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी काही तासांतच त्याला उत्तर प्रदेशच्या सीमेवरून अटक केली.
मुख्याध्यापक सक्सेना यांनी शाळेच्या गेटजवळ आरोपीला फिरत असताना पाहिले आणि त्याला तासिका बुडवून बाहेर फिरू नकोस, असे सांगितले होते. यावर चिडून आरोपीने गेटजवळच्या शौचालयात जाऊन त्यांच्यावर गोळी झाडली आणि नंतर पळ काढला. मुख्याध्यापकांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात, आरोपीने, मुख्याध्यापक सक्सेना नेहमी ओरडायचे आणि ‘गुंडगिरी’ करू नकोस, असे सांगत असत, म्हणूनच हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, “हा मुलगा मनोविकारग्रस्त वाटतो. त्याला त्याच्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. सध्या त्याच्यावर वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत.”
या प्रकरणात आरोपीसोबत असलेल्या त्याच्या नातेवाइक मित्रालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या मित्राने आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले जात असले तरी त्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी चौकशी सुरू आहे.
गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे. ती एका गावातील व्यक्तीकडून मिळाल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. परंतु, त्या व्यक्तीचे निधन दोन महिन्यांपूर्वी छत्तीसगडच्या रायपूरमध्ये झाले असल्याने, या दाव्याची सत्यता पडताळली जात आहे.
मुख्याध्यापक सक्सेना गेली पाच वर्षे धमोरा शाळेत कार्यरत होते. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सक्सेना शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून ओळखले जात होते. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजवली आहे.





