Student Safety : भुईंज येथील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास! शिक्षणाची वहिवाट बिकट; सेवा रस्त्यावरील भयावह वास्तव
Student Safety : भुईंज बसस्थानक ते कर्मवीर विद्यालय सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडीचा विळखा; अल्पवयीन दुचाकीस्वारांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

Student Safety – भुईंज येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार महामार्गावर असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे विद्यार्थी सेवा रस्त्यावर धोकादायकपणे ये-जा करत आहेत. सुसाट वेगाने वाहणाऱ्या दुचाकी, मद्यपींची गर्दी, वाढती वाहतूक कोंडी यामुळे विद्यार्थी त्रस्त असून विद्यालयातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वहिवाट बिकट झाल्याचे निदर्शनास येत आहे.
या विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी देगाव, शिरगाव, किकली, जांब, बदेवाडी, भिरडाचीवाडी, अनवडी, चाहूर, बेलमाची, काळंगवाडी, खोलवडी, लगडवाडी इत्यादी गावातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी विद्यालयात येत असतात. विद्यालयात येण्यासाठी त्यांना भुईंज बसस्थानक ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय या सेवा रस्त्यावरून ये-जा करावी लागते.
विद्यालय भरताना व सुटताना या सेवा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी या सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करत वाहन चालवावे लागते. शाळा सुटल्यानंतर कित्येक अल्पवयीन मुले या गर्दीतून सुसाट वेगाने दुचाकी चालवताना आढळतात.
या गर्दीत एखादा अपघात घडल्यास यास जबाबदार कोण ? या सेवा रस्त्याच्या गर्दीतून वाट काढत विद्यार्थी विद्यार्थिनींची तारांबळ उडत असून शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होताना दिसते. या सेवा रस्त्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष उपाययोजनांची आवश्यकता निर्माण झाली आहे.
शाळा, क्लासेस सुटल्यानंतर किकली, बेलमाची, लगडवाडी, मापरवाडी, काळंगवाडी, खोलवडी, जांब या आपल्या गावी जाण्यासाठी विद्यार्थी कारखाना रोडवर उभे असतात. मात्र, गावांना वेळेवर एसटी बस नसल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना इतर वाहनांचा आधार घेत तासंतास या रस्त्यावर वाहनांची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे. एसटी बसचे वेळापत्रक वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
भुईंज बसस्थानक ते कर्मवीर विद्यालय फुटपाथ गरजेचा
भुईंज बसस्थानक ते कर्मवीर विद्यालय सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी भुईंज बस स्थानक ते कर्मवीर विद्यालय या दरम्यान फुटपाथ बांधल्यास विद्यार्थ्यांची सुरक्षितता अबाधित राहील. यासाठी लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन फुटपाथ मंजूर करून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी. अशी मागणी पालक वर्गातून व्यक्त होत आहे.





