प्रभात वृत्तसेवा जांबूत – दिवाळीनंतर पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्यांचा बळी गेल्यानंतर प्रचंड दहशत निर्माण झाली. पालकांनी तर आपल्या मुलांना शाळेत पाठवणेच बंद केले. त्यामुळे शिक्षण खात्यासमोर मोठा पेच निर्माण झाला. शेवटी विद्यार्थ्यांचा जीव सर्वात मौल्यवान आहे… त्यांना भीतीच्या सावटातून बाहेर काढणे हीच आजची खरी जबाबदारी आहे. शिरूर–आंबेगाव–खेड–जुन्नर हा पट्टा गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे अतिसंवेदनशील मानला जातो. भीती, असुरक्षितता आणि अनिश्चिततेच्या छायेत दिवस जात असलेल्या या भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अखेर प्रशासनाने महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. शासन आदेशानुसार बिबटप्रवण क्षेत्रातील सर्व शाळांची वेळ सकाळी ९.३० ते दुपारी ४ अशी बदलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे प्राणरक्षण हेच ध्येय ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी स्पष्ट केले.सध्या ऊसतोडीमुळे अनेक क्षेत्रे रिकामी झाली असून बिबट्यांचा वावर रस्त्यांच्या अधिक जवळ येऊ लागला आहे. त्यात हिवाळा, अंधार लवकर पडतोय, रस्ते ओस पडतात… अशा वेळी विद्यार्थी घरी जाताना धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. ऊसजंगल, डोंगराळ भाग, ओसाड रस्ते यातून जाताना त्यांच्या मनात नेहमी एकच भीती… कुठे काही अनर्थ होऊ नये, पालकांच्या मनात अजूनच घालमेल. बिबट्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांनी परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती.या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून प्रशासनाने विद्यार्थ्यांचे जीवित धोक्यात येऊ नये म्हणून हा निर्णायक पाऊल उचलले. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्व शाळांना परिपत्रक देत स्पष्ट निर्देश दिले आहेत, शाळेच्या वेळेत बदल करताना शाळा व्यवस्थापन समिती व शाळा समितीची मंजुरी घ्यावी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी संध्याकाळी अंधार होण्यापूर्वी घरी पोहचले पाहिजे, सकाळच्या परिपाठात सुरक्षिततेबाबत उद्बोधन अनिवार्य, पालक मेळावे घेऊन विद्यार्थ्यांना आणताना–नेताना पालकांनी काळजी घ्यावी. वर्गशिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची खात्री करावी, विद्यार्थी सुरक्षा समितीच्या बैठका दर महिन्याला घेऊन अतिरिक्त उपाययोजना कराव्यात.बिबट्या प्रकरण गंभीर असले तरी अशा संवेदनशील, कृतीशील आणि विद्यार्थीप्रेमी निर्णयामुळे आशेची नवी किरणं दिसू लागली आहेत.विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न प्रशासनाने ज्या प्राधान्याने हाताळला, त्यातून खरी मानवीता आणि जबाबदारी दिसून आली आहे. विद्यार्थ्यांचा जीव वाचणे हीच जबाबदारी शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके नव्हे तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता हीच शिक्षणव्यवस्थेची पहिली पायरी. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय केवळ वेळ बदलण्यापुरता नाही; तो हजारो पालकांच्या मनातील काळजी कमी करणारा, ग्रामीण भागातील मुलांसाठी आश्वासक असा पुढाकार आहे. ग्रामस्थ, शिक्षक, पालक यांच्यात या निर्णयाबद्दल समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी आता तरी मुलं सुरक्षितपणे शाळेत जाऊ-येऊ शकतील, असा दिलासा व्यक्त केला.