Education Loan : परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज काढावे का? याचे फायदे-तोटे काय आहेत? जाणून घ्या

Education Loan | भारतातील लाखो पालकांचं आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचे स्वप्न असते. मात्र, परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रचंड खर्च येतो. या स्वप्नपूर्तीसाठी अनेक वेळा मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कर्ज घेतले जाते. आकडेवारीनुसार, 2024 च्या अखेरीस 13.3 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेतले होते.
मात्र, शैक्षणिक कर्ज घेणे खरचं फायद्याचे आहे का? याचे फायदे आणि तोटे काय आहेत? याविषयी जाणून घेऊयात.
शैक्षणिक कर्जात झपाट्याने वाढ
रिपोर्टनुसार, भारतातील प्रमुख गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFCs) विद्यार्थ्यांना दिलेल्या कर्जात मोठी वाढ झाली आहे.2023 मध्ये जिथे विद्यार्थी कर्जांचे एकूण मूल्य 43,000 कोटी रुपये होते, ते 2024 मध्ये 60,000 कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.
शिक्षण कर्जाचे फायदे
- सुलभ उपलब्धता: शैक्षणिक कर्जामुळे आर्थिक अडचणीत असलेल्यांनाही परदेशात शिक्षणाची संधी मिळते. यामध्ये शिक्षण शुल्क, राहणीमान, प्रवास व पुस्तके यांचा समावेश असतो.
- मोरेटोरियमचा लाभ: बहुतेक कर्जांत शिक्षण संपल्यावर 6-12 महिन्यांचा हप्ता माफ कालावधी मिळतो, जो नोकरी शोधण्यास उपयोगी ठरतो. म्हणजेच, शिक्षण संपल्यानंतर कर्जाची परतफेड करता येते.
- क्रेडिट स्कोअर सुधारणा: नियमित ईएमआय भरल्यास भविष्यात अन्य कर्ज मिळणे सोपे होते.
- लवचिक परतफेड योजना: उत्पन्नानुसार ईएमआय समायोजित करण्याची सुविधा अनेक वित्तीय संस्थांकडून दिली जाते.
शिक्षण कर्जाचे तोटे
- कमी वयात कर्जाचा डोंगर: 20-25 वर्षांच्या वयात लाखोंचं कर्ज फेडणे हे मानसिक आणि आर्थिक दोन्ही पातळींवर तणावदायक असू शकते.
- व्याज: हप्ते वेळेवर न भरल्यास व्याज वाढत जाते, आणि एकूण परतफेड रक्कम दुप्पट होऊ शकते.
- आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम: नियमित हप्त्यांचा ताण व्यक्तिगत आयुष्यावर व खर्चाच्या निर्णयांवर परिणाम करतो.
- डिफॉल्टचा धोका: नोकरी उशिरा मिळाल्यास किंवा उत्पन्न कमी असल्यास कर्ज फेडता न आल्याने क्रेडिट स्कोअरवर गंभीर परिणाम होतो.
कर्ज घेण्यापूर्वी काय विचार करावा?
- तुमची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील उत्पन्नाची शक्यता तपासा.
- बँक/एनबीएफसीच्या अटी आणि व्याजदर नीट वाचा.
- नोकरीच्या शक्यता आणि पगार किती मिळू शकतो हे समजून घ्या.
- ईएमआय भरण्याची क्षमता लक्षात घ्या.

