पुणे जिल्हा | संघर्षमय प्रवास व्हाया बिग बॉस

बारामती, (प्रतिनिधी)- रिल्सस्टार’ सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या 5 व्या पर्वाचा विजेता ठरला आहे. गायक अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघेजण अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते.
अखेरीस अभिनेता आणि बिग बॉस मराठीचा निवेदक रितेश देशमुखनं सूरज चव्हाणचा हात उंचावत विजेता घोषित केले.
त्यानंतर अवघ्या बारामती तालुक्यात सूरज चव्हाण याच्यावर शुभेच्छांचा वर्षांव केला. यावेळी सोशल मीडिया कौतुक सोहळ्याने व्यापून गेला होता.
बिग बॉस मराठीच्या 5 व्या पर्वाचा महाअंतिम सोहळ्यात 16 सदस्यांना मागे टाकत सूरजने ट्रॉफीवर नाव कोरले. विजेता ठरलेल्या सूरज याला ट्राफीसह 14 लाख 60 हजार रुपये रक्कम मिळाली. इतर अनेक बक्षीसांचा वर्षावही झाला आहे. “सूरजच्या रिल्सस्टार ते बिग बॉस मराठीचा विजेता बनण्यापर्यंतच्या प्रवास हा संघर्षमय होता.
हलाखीच्या स्थितीतून यशोशिखर गाठले
सूरज चव्हाण हा मूळचा बारामती तालुक्यातील मुडवे गावचा आहे. हलाखीच्या परिस्थितीत सूरजचे बालपण गेले. सूरज हा 10 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. या धक्क्यातून त्याची आई सावरू शकली नाही. ती आजारी पडली.
या आजारपणातूनच पुढे सूरजच्या आईचंही निधन झाले. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मागे सूरज आणि त्याच्या पाच बहिणी या भावंडांनी एकमेकांना आधार दिला. बिकट परिस्थितीमुळे सूरजला आठवीपर्यंत शिक्षण घेता आले. त्यानंतर हाताला मिळेल ते काम करून सूरज चार पैसे कमवू लागला. हलाखीच्या स्थितीतून जात असतानाच, सूरजच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं.
भारतात तेव्हा टिकटॉकचा बोलबाला सुरू होता. सूरज हा टिकटॉकवरून ऑनलाइन प्रवास सुरू केला. टिकटॉकवरील रिल्सच्या माध्यमातून तो मनोरंजन करू लागला.
टिकटॉकवर भारतात बंदी आणल्यानंतर सूरज इन्स्टाग्रामकडे वळला. इन्स्टाग्रामवरुनही त्याने चाहत्यांचे मनोरंजन सुरू ठेवले.
इन्स्टाग्रामवर त्याचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. ‘बुक्कीत टेंगूळ’, ‘गुलीगत धोका’, ‘झापुक झुपूक’ अशा शब्दांमुळे तो नेटकऱ्यांत प्रसिद्ध झाला, यातूनच त्याला बिग बॉस मराठीची ऑफरही मिळाली.
इन्स्टाग्रामवरुनही त्याने चाहत्यांचे मनोरंजन सुरू ठेवले. इन्स्टाग्रामवर त्याचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. यातूनच त्याला बिग बॉस मराठीची ऑफरही मिळाली.
बिग बॉस विजेता सूरजने आपल्या स्वभावाने प्रेक्षकांचे मन जिंकलं. पण हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. अनेक प्रसिद्ध आणि नावाजलेल्या कलाकारांशी त्याची स्पर्धा होती. त्यातच त्याला खेळ समजत नाही, अशी टीकाही त्याच्यावर होत राहिली.
मात्र, सर्व अडथळ्यांना पार करीत त्याने आपला मार्ग शोधला. त्याचा संघर्ष, साधेपणा प्रेक्षकांना भावला. प्रेक्षकांनीही त्याला दाद दिली.
आमची परिस्थिती नव्हती, वाटत नव्हतं तो इतक्या वर जाईल म्हणून पण तो शून्यातून वर आला, याचा आनंद आहे, अशी भावना सूरज याच्या बहिणीने व्यक्त केली.
अजित पवारांनीही सूरज चव्हाण याचे अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!”
सूरजच्या विजयानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) पोस्ट शेअर करत अभिनंदन केलं.
सुळे म्हणाल्या की, सूरज याने प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन हे यश मिळविले. सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
सूरजला बक्षीस काय मिळालं
बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात विजयी ठरल्यानंतर सूरजवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. या पर्वातील ट्रॉफीसह विजेत्या सूरजला पहिल्या क्रमांकाच्या बक्षीसस्वरुपात 14 लाख 60 हजारांचा चेक मिळाला.
कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ अॅन्ड सन्स यांच्याकडून सूरजला 10 लाखांचा धनादेश जाहीर केला. एक इलेक्ट्रिक बाईकही त्याला बक्षीस स्वरुपात मिळाली. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजला घेऊन एक चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा केली आहे.

