तालुकाध्यक्षपदासाठी लंघे-मुरकुटे गटात रस्सीखेच!

अशोक भुसारी
सोनई, दि. 2 – भाजप तालुकाध्यक्षपदाच्या नेमणुकीसाठी जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे आणि माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्यात संघर्ष उभा राहिल्याचे चित्र दिसत आहे. नेवासा भाजपमध्ये दोन गट पडले असून, विठ्ठल लंघे आणि माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांना आपल्याच कार्यकर्त्याची या पदावर वर्णी लागावी अशी इच्छा असून, यासाठी रस्सीखेच सुरू आहे. या निवडीवर एकमत होत नसल्याने बंडाळीची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच सोनई येथून पालकमंत्र्यांना आम्ही सांगतो तो अध्यक्ष करा, असा मेसेज गेल्याने अध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडली आहे.
भाजप तालुकाध्यक्षपदासाठी पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासमोर पंधरा दिवसांपूर्वी अनेकांनी मुलाखती दिल्या. नेवाशाच्या मुलाखतीसाठी मात्र ठरावीक कार्यकर्त्यांनाच निरोप देण्यात आले. जे इच्छुक आहेत त्यांना कोणताही निरोप दिला गेला नाही. जिल्हाध्यक्ष लंघे यांनी नेवाशातील कार्यकर्त्यांना अंधारात ठेवल्याचा कार्यकर्त्यांचा सूर आहे; शिवाय माजी आ. मुरकुटे यांना या मुलाखतीची कल्पनाच दिली नाही. त्यामुळे नेवासा भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. काहींनी तर थेट माधव भंडारी यांना फोन करून मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असून, 25-30 वर्षांपासून काम करत असूनही मुलाखतीला का बोलावले नाही, असा थेट सवाल केल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले.
चार दिवसांपूर्वी ऑनलाइन मतदान घेण्याचा पक्षाने फार्स केला. यात ऋषिकेश शेटे, माऊली पेचे, अंकुश काळे, कैलास दहातोंडे यांना अध्यक्षपदासाठी मतदान झाले. मात्र, माजी तालुकाध्यक्ष माऊली पेचे यांना सर्वाधिक मते पडल्याची चर्चा आहे. पेचे यांना भाजपच्या विरोधी गटाकडून मोठ्या प्रमाणात मतदान टाकल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हा गट पालकमंत्री विखे यांच्याशी जवळीक असलेल्यांचा आहे. त्यामुळे विखे सांगतील तोच अध्यक्ष नेवाशात होणार आहे अशी चर्चा आहे.
तालुक्यात नगर उत्तर दक्षिणचे जिल्हाध्यक्षपद विठ्ठल लंघे यांना पालकमंत्र्यांच्या कृपाशीर्वादाने मिळाले असताना तालुक्यात मात्र भाजपमध्ये दोन गट पडले असल्याचे दिसत आहे. लंघे-मुरकुटे आगामी विधानसभेसाठी इच्छुक असल्याने दोन्ही नेते आपापला गट वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच भाजपचे तालुकाध्यक्षपद आपल्याकडे राहण्यासाठी लंघे-मुरकुटे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या अंतर्गत कलहामुळे अध्यक्षपद बाळासाहेब मुरकुटे यांच्या गटाकडे की विठ्ठल लंघे गटाकडे यावरच पुढील निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा जोरात आहे.
“ओबीसीच चेहरा द्या’
तालुक्यात मराठा ओबीसी हा मुद्दा पुढे आला असून, विद्यमान तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांना प्रदेश पातळीवर कार्यकारिणीत घेतल्याने तालुकाध्यक्षपद रिक्त आहे. या पदासाठी पुन्हा ओबीसीच चेहरा द्यावा, अशी मागणी तालुका उपाध्यक्ष प्रमोद पेहेरे यांनी केली आहे. नेवाशात ओबीसींची संख्या 60 टक्क्यांहून जास्त असल्याने ओबीसी समाजाला अध्यक्षपद देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे.





