शेअर बाजारात जोरदार तेजी: सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.३५ लाख कोटींची वाढ

मुंबई – भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (10 ऑक्टोबर) पुन्हा एकदा तेजी परतली. एक दिवसाच्या घसरणीनंतर बाजाराने आज दमदार पुनरागमन केले. सेन्सेक्स तब्बल 398.44 अंकांनी (0.49%) वाढून 82,172.10 वर बंद झाला, तर निफ्टी 135.65 अंकांनी (0.54%) वाढून 25,181.80 या स्तरावर स्थिरावला.
फार्मा, आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराला भक्कम आधार मिळाला. परदेशी गुंतवणूकदारांच्या सलग दुसऱ्या दिवशीच्या खरेदीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
आजची तेजी सर्वत्र पसरलेली दिसली. सर्व सेक्टोरल इंडेक्स हिरव्या चिन्हात बंद झाले. यामध्ये निफ्टी मेटल इंडेक्सने जवळपास 2% वाढीसह सर्वाधिक कामगिरी केली. आयटी आणि फार्मा इंडेक्समध्येही सुमारे 1% ची वाढ नोंदवली गेली. ब्रॉडर मार्केटमध्येही तेजीचे वातावरण होते. बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.78% आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.18% ने वाढले.
गुंतवणूकदारांची संपत्ती 2.35 लाख कोटींनी वाढली. बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य (Market Capitalisation) आज वाढून ₹460.38 लाख कोटींवर गेले. बुधवारी (9 ऑक्टोबर) हे मूल्य ₹457.94 लाख कोटींवर होते. म्हणजेच, आज केवळ एका दिवसातच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ₹2.35 लाख कोटींची वाढ झाली.
सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्यापैकी सर्वाधिक वाढ टाटा स्टील (Tata Steel) च्या शेअर्समध्ये दिसली, जे 2.65% उंचावले. त्याचप्रमाणे एचसीएल टेक (HCL Tech), अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement), सन फार्मा (Sun Pharma) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (Bharat Electronics) हे शेअर्स 1.42% ते 2.21% दरम्यान वाढले.
बीएसईवर आज एकूण 4,350 शेअर्समध्ये व्यवहार झाला. यापैकी 2,111 शेअर्स वाढीसह, 2,068 शेअर्स घसरणीसह, तर 171 शेअर्स स्थिर राहिले. याशिवाय, 155 शेअर्सनी आपला 52 आठवड्यांचा उच्चांक, तर 149 शेअर्सनी आपला 52 आठवड्यांचा नीचांक गाठला.




