पुणे | शहरासह उपनगरांत दमदार हजेरी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ढगांच्या गडगडाटांसह सलग तिसऱ्या दिवशी दुपारनंतर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी साडेचारच्या सुमारास हडपसर, मगरपट्टा आणि वडगावशेरी परिसरात धो-धो पाऊस झाला,
तर शिवाजीनगर, एनडीए, कात्रज, सिंहगड रोड परिसरात पावसाच्या जोरदार, तर काही भागात संततधार पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मगरपट्टा परिसरात सर्वाधिक ३८, तर हडपसर भागात २१ मिमी पावसाची नोंद झाली.
मागील दोन दिवसांपासून शहराच्या दक्षिण भाग परिसरातील हडपसर, वडगावशेरी परिसरात ढगफुटी झाल्यामुळे जनजजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचले, विद्युतपुरवठा खंडित झाला. झाडपडीच्या घटनांमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला.
दरम्यान, आज (दि. १९) सकाळपासून शहरात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. दुपारी उन्हाचा चटका होता. चारनंतर हडपसर, मगरपट्टा, कोरेगांव पार्क, वडगावशेरी, मुंढवा परिसरात धो-धो पावसाला सुरवात झाली. तेथे पाऊण तासात २० ते ४० मिमी पावसाची नोंद झाली.
रक्षाबंधनामुळे शहरात वर्दळ असताना पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. काही भागात वाहतूक कोंडी झाली होती.
दोन दिवस सायंकाळी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले असून, नाले भरून वाहू लागल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह उपनगरांत दुपारनंतर मध्यम ते जोरदार सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
शहरासह जिल्ह्यात झालेला पाऊस
मगरपट्टा ४०, हडपसर २८, भोर १८, निमगिरी १५, ढमढेरे ११, वडगावशेरी १०, शिवाजीनगर ८, लोणावळा आणि हवेली ५, कोरेगांव पार्क आणि एनडीए ३ मिमी पावसाची नोंद झाली.
ढगफुटी नाही पण पावसाची संततधार
मागील दोन दिवसांत हडपसर आणि वडगावशेरी परिसरात ढगफुटी झाली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा जोर एवढा होता,
की या भागातील बहुतांश रस्त्यावरील पाणी अजूनही ओसरलेले नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी ढगफुटीची भीती होती. आज दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. मात्र, पावसाचा जोर कमी होता.





