“सीमेपलीकडील दहशतवादाच्या नायनाटासाठी कठोर कारवाई गरजेची”; फ्रान्समधून पंतप्रधानांचा हल्लाबोल

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. त्यासोबतच दहशतवादाच्या विरोधातील लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी,’आपल्या सीमेपलीकडील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे असल्याचे मत दोन्ही देशांच्या नेत्यांनी मांडले. दहशतवादाच्या विरोधातील लढाईसाठी आणखी पावले उचलण्याचे दोन्ही देशाने मान्य केल्याचे पंतप्रधान म्हणाले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याची भारत आणि फ्रान्सची विशेष जबाबदारी असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
करोनाचे संकट आणि युक्रेनमधील युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. याचा विशेषतः ‘ग्लोबल साउथ’ देशांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. ही चिंतेची बाब असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अशा समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे. सर्व वाद हे संवादानं सोडवले जाऊ शकतात असा आमचा विश्वास असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत शाश्वत शांततेसाठी योगदान देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.





