नेवासा : गुन्हे शाखेच्या पोलीसांची धडक कारवाई; गोवंशी जनावरांची केली सुटका

नेवासा – शहरातील शेंडे गल्ली येथे असलेल्या भरावाजवळील एका काटवणात गोवंशी जातीची जिवंत जनावरांची सुटका करण्यात आली आहे. गोवंशी जनावरांची कत्तल करण्याची मनाई असतांनाही कत्तल करण्याच्या उद्देशाने या जनावरांना निर्दयतेने बांधून ठेवल्याची माहिती नगर येथील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हेमंत थोरात यांना मिळाली होती.
या माहितीनंतर, गुरुवार (दि.२) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पंचासह नेवासा येथील घटनास्थळी पोहचून जिवंत गोवंशी जनावरांची सुटका करण्यात आली. या कामगिरीनंतर गुन्हे शाखेच्या या धाडसी कारवाईचे नेवासकरांतून मोठे कौतुक केले जात आहे.
याप्रकरणी सुमारे १३ लाख ४० हजार रुपये किंमतीचे गोवंशी जनावरे पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. तर पोलीस पथक नेवासा बसस्थानक येथून पंचासह घटनास्थळी दाखल झाले असता, पोलीस ताफा येत असल्याचे पाहून गोवंशी जनावरे डांबून ठेवलेल्या इसमांनी घटनास्थळावरुन धूम ठोकली.
त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पळून गेलेल्या इसमांची परिसरात चौकशी करुन त्यांची माहिती घेतली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पो.कॉ.संदिप दरंदले गुन्हे शाखा नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





