प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 – शहरात यंदा लहान मोठी 961 मंडळे दहीहंडी उत्सव साजरा करणार असून दुपारपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, एसआरपीएफ आणि होमगार्डसह एकूण अडीच हजार कर्मचारी रस्त्यावर असणार आहेत.
दहीहंडीसाठी शहरातील महात्मा फुले मंडई परिसर, हुतात्मा बाबू गेनू चौक, बेलबाग चौक, शिवाजी रस्ता आदींसह उपनगरात दहीहंडी उत्सवासाठी गर्दी होते. विशेषतः शहराच्या मध्य भागातील मंडळे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात. दहीहंडीच्या दिवशी (दि. 19) रात्री 10 वाजेपर्यंत हंडी फोडता येणार आहे.
या सर्व पाश्वभूमीवर शहर परिसरात शुक्रवारी दुपारपासूनच बंदोबस्त तैनात असणार आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त असणार आहे. यासाठी पोलिसांसह अतिरीक्त होमगार्ड, एसआरपीएफची कंपनी देखील असणार आहे. त्याबरोबरच सीसीटीव्हीवरून गर्दीच्या ठिकाणी मंडळांवर लक्ष राहणार आहे.
असा असेल बंदोबस्त…
दहीहंडीच्या दिवशी शहरात दोन अतिरीक्त आयुक्त दर्जाचे अधिकारी, पाच उपायुक्त, दहा सहायक आयुक्त, 69 पोलीस निरीक्षक, 271 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, 1 हजार 916 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड, एसआरपीएफ असे एएकूण अडीच हजार कर्मचारी रस्त्यावर असणार आहेत.