भारतात व्हिसा-पासपोर्टशिवाय एंट्रीवर कठोर नियम; मोठा दंड आणि तुरूंगवासही भोगावा लागणार

नवी दिल्ली – केंद्र सरकार व्हिसा-पासपोर्टशिवाय भारतात प्रवेश करण्याबाबत कडक कायदा आणणार आहे. जर एखादा परदेशी नागरिक वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करत असेल तर त्याला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दरम्यान, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यापासून तेथिल अवैध स्थलांतरितांवर कठोर कारवाई केली जात आहे. अवैध पणे अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांना देशाबाहेर हकालले जात आहे. त्याचप्रमाणे आता भारतातही अवैध स्थलांतरितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
जर कोणताही परदेशी व्यक्ती बनावट कागदपत्रांसह भारतात प्रवेश करत असेल तर त्याला येथून हद्दपार केले जाऊ शकते. याशिवाय, २ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, जो ७ वर्षांपर्यंत वाढवता येतो. त्याच वेळी, १ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
हा नियम इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट, २०२५ अंतर्गत आहे, जो सरकार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करेल.
इमिग्रेशन आणि परदेशी लोकांशी संबंधित विषयावर बनवलेले चार वेगवेगळे नियम एकत्र करणे हा त्याचा उद्देश आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर, परदेशी कायदा १९४६, पासपोर्ट कायदा १९२०, परदेशी नोंदणी कायदा १९३९ आणि इमिग्रेशन (करिअर दायित्व कायदा) २००० मध्ये सुधारणा करून एक व्यापक कायदा बनवला जाईल.
सध्या ५ वर्षांची शिक्षा आणि दंड –
सध्या, अवैध पासपोर्ट किंवा व्हिसासह प्रवास करणाऱ्या परदेशी नागरिकांना ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. बनावट पासपोर्ट घेऊन प्रवेश करणाऱ्यांना जास्तीत जास्त ८ वर्षांचा तुरुंगवास आणि ५०,००० रुपये दंडाची तरतूद आहे.





