करोनाची साखळी तोडण्यासाठी शिवसेनेची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसाला 200-300 हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. करोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी महापालिका आयुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील करोना बाधितांचा आकडा चार हजारांच्या उंबरठ्यावर आहे. मागील काही दिवसांपासून एका दिवसाला 200-300 हून नवीन रुग्ण सापडत आहेत. यामुळे शहरातील रुग्णालयात बेडची संख्या अपुरी पडत आहे. शहरात करोनाचा विळखा घट्ट झाला आहे. आता खऱ्या अर्थाने करोनाची साखळी तोडण्याची आवश्यकता आहे.
करोनाची साखळी तोडण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, पनवेल महापालिकांनी लॉकडाऊन केला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातही करोनाची साखळी तोडण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही कठोर पाऊले उचलणे अत्यंत आवश्यक आहेत. किमान 7 ते 15 दिवसांचा कठोर लॉकडाऊन करावा, अशी मागणी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केली आहे.