पुणे | उमेदवारांच्या खर्चावर कडक पहारा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांअंतर्गत खर्चविषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, ए. वेंकादेश बाबू यांनी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.
या वेळी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवाव्यात. अवैधरीत्या वाहतूक होणारे पैसे, दारू किंवा इतर आमिषाच्या बाबींवर विविध पथकांच्या माध्यमातून कडक लक्ष ठेवण्यात यावे, अशा सूचना या अधिकाऱ्यांनी दिल्या.
या वेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, सोनाप्पा यमगर,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियत्रंण कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे, सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी नियुक्त सहायक खर्च निरीक्षक, खर्चविषयक सहायक समन्वयक अधिकारी, यांच्यासह सर्व संबंधित अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
उमेश कुमार म्हणाले, जिल्हा नियत्रंण कक्षात येणाऱ्या तक्रारी दैनंदिन निकाली काढून अहवाल सादर करावेत. सर्व बाबतीत सहायक खर्च निरीक्षक यांच्याशी संपर्कात राहून निवडणूक कामकाज पार पाडावे.
ए. वेंकादेश बाबू म्हणाले, खर्च संवेदनशील मतदारसंघांमध्ये एक भरारी पथक (एफएसटी) व एक स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी) वाढवावे. या सर्व पथकांचे तीन पाळीमध्ये काम होईल याची दक्षता घ्यावी.
डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एफएसटी, एसएसटी, व्हिडिओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) पथकातील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असून, दिलेल्या जबाबदारीप्रमाणे आपापल्या मतदारसंघात कामे करीत आहेत. या आढावा बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही डॉ. दिवसे म्हणाले.





