Stress & Obesity: आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव (स्ट्रेस), चिंता आणि नैराश्य या समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. मानसिक आरोग्याच्या या अडचणी केवळ मनापुरत्याच मर्यादित राहत नाहीत, तर त्यांचा थेट परिणाम शरीरावरही होतो, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. अनेक अभ्यासांमधून असं समोर आलं आहे की, सतत तणावात राहणाऱ्या लोकांमध्ये झोपेचे विकार, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका अधिक असतो. यासोबतच एक महत्त्वाचा धोका म्हणजे वजन वाढण्याची शक्यता. स्ट्रेस आणि वजन वाढण्यामागचं कारण काय? जेव्हा एखादी व्यक्ती सतत तणावात असते, तेव्हा शरीर ‘फाइट मोड’मध्ये जातं. या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाचं हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतं. हे हार्मोन शरीराला “ऊर्जा साठव” असा संदेश देतं. परिणामी शरीरात चरबी साठू लागते, विशेषतः पोट आणि कंबरेभोवती. याच काळात भूकही वाढते आणि व्यक्ती गरजेपेक्षा जास्त खायला लागते. यामुळे वजन झपाट्याने वाढू शकतं. weight gain इमोशनल ईटिंग म्हणजे काय? स्ट्रेसमुळे होणाऱ्या या सवयीला इमोशनल ईटिंग किंवा स्ट्रेस ईटिंग असं म्हटलं जातं. ताण, राग, भीती, एकटेपणा, कंटाळा किंवा दुःख अशा नकारात्मक भावना कमी करण्यासाठी अनेक जण खाण्याचा आधार घेतात. तज्ज्ञांच्या मते, अशा वेळी मेंदूतील रिवॉर्ड सिस्टम सक्रिय होते. गोड किंवा जंक फूड खाल्ल्यामुळे मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन तयार होतं, ज्यामुळे थोड्या वेळापुरतं बरं वाटतं. पण हळूहळू मेंदू शिकतो की वाईट भावना आल्या की खाणं हाच सोपा उपाय आहे. इमोशनल ईटिंगमुळे जाडेपणा कसा वाढतो? इमोशनल ईटिंगमध्ये खाल्लं जाणारं अन्न बहुतांश वेळा हाय-कॅलरी, गोड किंवा तेलकट असतं. यामुळे: कॅलरी इनटेक वाढतो अतिरिक्त कॅलरी शरीरात फॅटच्या स्वरूपात साठतात मेटाबॉलिज्म मंदावतो वजन वेगाने वाढतं दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास लठ्ठपणा, इन्सुलिन रेसिस्टन्स आणि टाइप-२ डायबिटीजचा धोका वाढू शकतो. स्ट्रेस कंट्रोल करणं का गरजेचं आहे? कारण सततचा ताण, फक्त मन नाही, तर शरीरही आजारी करतो वजन वाढवतो अनेक गंभीर आजारांचा धोका वाढवतो म्हणूनच वेळेवर स्ट्रेस ओळखणं, भावनांशी संवाद साधणं, योग्य आहार आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे.