नगर – मनपाअंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री स्वनिधी शहरी फेरीवाला, पथविक्रेता सूक्ष्म पतपुरवठा या वैयक्तिक कर्ज योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मनपाच्या दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान विभाग आणि मार्केट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 2 हजार 842 पथविक्रेते यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे पथविक्रेते यांचे उदयोग व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेकांचे हातावरचे पोट असल्यामुळे या योजने अंतर्गत त्यांना व्यवसाय करण्यासाठी हातभार लागणार आहे. शहरी फेरीवाला, पथविक्रेता यांना सूक्ष्म पतपुरवठा करण्यासाठी मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पात्र लाभार्थींना बॅंके मार्फत प्रती लाभार्थी 10 हजार इतके कर्ज उपलब्ध होणार आहे.