नगररस्ता अतिक्रमण मुक्त; महापालिका इतर रस्त्यांवरही राबविणार कारवाई मोहीम

वडगावशेरी – येरवडा (गुंजन चौक) ते विमाननगर फिनिक्स मॉलपर्यंतचा बीआरटी मार्ग काढण्याच्या कामास शनिवारी (दि. 24) सुरवात झाली. प्रायोगिक तत्त्वावर हा मार्ग हटविण्यात येत आहे. यासह नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेली बहुतांश अतिक्रमणे हटविण्यात आली असून नगर रस्ता अतिक्रमणमुक्त व स्वच्छ करण्यात येत आहे, मनपा प्रशासनाच्या कामाबाबत नगारिकांकडून समाधान व्यक्त केले आहे. तर, या कारवाईत सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अन्य महत्त्वाचे रस्तेही अतिक्रमण मुक्त काढण्यावर महापालिका भर देणार आहे.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेत बीआरटी मार्ग काढण्यापूर्वीच रस्त्यालगतची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. सुमारे एक लाख 60 हजार चौरस फूट इतके अतिक्रमण मागील काही दिवसांमध्ये काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. अतिक्रमणे काढलेल्या ठिकाणी पदपथ बांधणी करणे किंवा अन्य पर्यायी सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
नगर रस्त्यावरील सुमारे पावणे दोन लाख चौरस फूट अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. शहरातील इतर 14 प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे याच पद्धतीने काढण्यात येणार आहेत. पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठीही उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले.
अतिक्रमणमुक्त होणारे रस्ते…
सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, वाघोली रस्ता, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता, कर्वे रस्ता या प्रमुख रस्त्यांसह अन्य काही महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यावर महापालिका देणार आहे.





