वडगाव मावळ, (प्रतिनिधी)- बेबडओहळ येथील एक्झर्बिया रिव्हर फ्रंट सोसायटीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहे. या भटक्या कुत्र्यांची सोसायटी व परिसरात दहशत पसरली आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे. तर सोसायटीतून भटके कुत्रे हाकलून द्या म्हटले तर प्राणमित्र विरोध करीत आहे. हे प्रकरण अगदी पोलीस ठाण्यात पोहचले असल्याची चर्चा आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कृष्णा मधुकर शेट्टी, अनू काटकर यांच्यासह अन्य काहीजण जखमी झाले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या सोसायटीमध्ये दहा ते पंधरा भटकी कुत्री आहेत. त्या कुत्र्यांपासून आमच्यासह लहान मुलांच्या जीवालाही धोका आहे असल्याची तक्रार एका ज्येष्ठ नागरिकाने केली. पण सोसायटीमध्ये प्राणी प्रेमी राहतात ते कोणतेही कारवाई करून देत नाही. पोलीस चौकीला गेलो तर प्राणीप्रेमी येऊन पोलिसांना ऍनिमल लॉ सांगून जातो. त्यामुळे कोणतीच कारवाई होत नसल्याचे येथील रहिवासी सांगत आहेत. या प्रश्नाकडे स्थानिक स्वराज्य संस्थेतील कारभारी मंडळींनी लक्ष टाकून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.