पुणे : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, अवकाळी पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी बसरला आहे. वीज कोसळून भोर तालुक्यात वडगावच्या युवकाचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. सणसवाडीत घरावर वीज कोसळून नुकसान झाले आहे. झाडपडी, पोल्ट्री शेड, आंबा बाग, तरकारी पिके, कांदा आदी शेतीमालाचे नुकसान झाले आहे. आंबेगाव तालुक्यात गावात २५ पेक्षा जास्त विजेचे खांब कोसळले आहेत. जुन्नरच्या पूर्व भागात गारपीट झाली आहे. खेड तालुक्याच्या काही भागांत वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. वीटभट्टी व्यवसायालाही बसला आहे. मुळशीत वादळी पावसाने झाडपडीच्या घटना समोर आल्या. घोटावडे फाटा-भरे रस्त्यावर झाड कारवर कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शिरूर तालुक्यात विठ्ठलवाडी मार्गावर बाभळीचे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मंचर बाजार समितीचे कांदा साठवण शेड जमीनदोस्त झाले आहे. आंबेगाव तालुक्यात अवकाळीचा फटका शेतीला बसला आहे. तरकारी पिकांच्या सर्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नव्याने लावलेल्या तसेच वाढीच्या अवस्थेतील रोपांना धोका निर्माण झाला आहे. भाजीपाला उत्पादकांना फटका बसला आहे. आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथे वादळी वारा आणि पावसामुळे पोल्ट्री फार्मचे नुकसान झाले. जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी येथे गारपीट झाली. गुळुंचवाडी आंबा बागांचे नुकसान झाले. काठापुर बुद्रुकमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने घरे, गोठ्याची पत्रे उडाली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. झाडे पडल्याने रस्ते बंद झाले होते. एकाच पावसात जिल्हा विस्कळीत उन्हाळ्यातील हा सर्वांत मोठा नुकसानकारक पाऊस ठरला आहे. ओढ्यांनाही पाणी आल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गतवर्षी हा पाऊस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला होता. यावेळी या पहिल्याच पावसाने शेतकरी, नागरिकांची वाताहात केली आहे. जिल्ह्यातील सर्वदूर पाऊस असल्याने सर्व घटकांना जबर तडाखा बसला आहे. हेही वाचा : Pune District : विधान परिषदेसाठी जगदाळेंचे नाव आघाडीवर