महाळुंगे इंगळे -चाकण परिसरात गुरुवारी (दि. 14) रात्री उशिरा विजेच्या कडकडाटात झालेल्या दमदार पावसाने काढणीस आलेल्या उन्हाळी बाजरीचे पीक भुईसपाट झाले. काही ठिकाणी घरांची पडझड झाली असून विटा व मका भिजला आहे. महामार्गावर तळे साचले आहे.
रासे, भोसे, खराबवाडी, निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, शेलगाव, दत्तवाडी, काळूस, माळवाडी, बहुळ, साबळेवाडी, चिंचोशी, कोयाळी, सिद्धेगव्हाण, काळूस, शिरोली, वाकी, वडगाव घेनंद आदी भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे धाडगे मळ्यातील शिवाजी धाडगे, अर्जुन धाडगे, भाऊ धाडगे, ऋषीकेश धाडगे यांच्या पाच एकरांमधील काढणीस आलेली उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली. चिक्कू बागेचे नुकसान झाले. मका, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, भोपळा, गवार, गहू आदी पिकांनाही फटका बसला आहे.
साठवून ठेवलेला कांदाही भिजला आहे. साठवून ठेवलेला चाराही भिजला आहे. अनेक ठिकाणी झाडांसह विजेचे खांब उन्मळून पडल्याने काहीवेळ वीज खंडित झाली होती. कोयाळी, शेलगाव, शिरोली, वाकी, मेदनकरवाडी आदी ठिकाणी वीटभट्टीवरील विटाही पावसाने भिजल्या आहेत.